नियतीचा बेरंग... देवदर्शन करून परतताना दाेन जिवलग मित्र ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 09:47 PM2023-06-18T21:47:45+5:302023-06-18T21:48:29+5:30
गडचिराेलीतील बेहरे पेंटरचा समावेश : अमरावती-नागपूर महामार्गावरील घटना
गडचिरोली : आयुष्यभर कुंचल्यातून रंग पेरणाऱ्या युवराज बेहरे या हरहुन्नरी कलावंतांच्या आयुष्याचा नियतीने बेरंग केला. देवदर्शन करून परतताना दोन जीवलग मित्रांच्या आयुष्याच्या प्रवासाला पूर्णविराम लागला अन् संपूर्ण शहर शोकाकुल झाले. अमरावती-नागपूर महामार्गावरील कोंढाळीजवळ १८ जूनला पहाटे ४ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
या अपघातात पेंटर युवराज बेहरे व त्यांचा छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथील मित्र, असे दोघेजण ठार झाले. युवराज बेहरे यांची पत्नी विभा बेहरे व राजनांदगाव येथील मित्राची पत्नीही जखमी झाली आहे. उपचारादरम्यान रविवारी सकाळी ८:३० च्या सुमारास युवराज बेहरे यांचे निधन झाले.
मृतक युवराज व्यंकटी बेहरे (वय ५०, रा. कन्नमवार वॉर्ड, गडचिरोली), गंभीर जखमी पत्नी विभा युवराज बेहरे व त्यांची मुले चार दिवसांपूर्वी आपल्या कारने महाबळेश्वर या ठिकाणी गेले होते. साेबत मित्राचे कुटुंबीय हाेते. दाेन वाहनांनी ते गावाकडे परत येत हाेते. समाेर बेहरे यांच्या मालकीची गाडी आणि मागे भाड्याने नेलेली दुसरी गाडी हाेती. पहिल्या गाडीच्या चालकाला डुलकी लागल्याने सदर गाडी उलटली. यात बेहरे यांचा मित्र जागीच ठार झाला, तर डाेक्याला दुखापत झाल्याने बेहरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बेहरे यांची मुले मागच्या कारमध्ये असल्याची माहिती असून, ते सुखरूप आहेत. त्यांची पत्नी विभा या गंभीर जखमी असून नागपूर येथे उपचार सुरू आहेत.
उत्तम कलावंताला गडचिराेलीकर मुकले
गेल्या २० वर्षांपासून युवराज बेहरे हे पेंटर म्हणून काम करीत. सुबक रांगाेळी काढण्याची कलाही त्यांना अवगत हाेती. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांतर्फे आयोजित कार्यक्रमात त्यांनी साकारलेली रांगाेळी लक्ष वेधून घ्यायची. त्यांच्या जाण्याने गुणी कलावंताला गडचिराेलीकर मुकले. त्यांच्या पार्थिवावर साेमवारी सकाळी ८ वाजता कठाणी नदी घाटावर अंत्यसंस्कार हाेणार आहेत.