सतर्कतेने टळला बसचा अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:30 AM2018-07-18T00:30:07+5:302018-07-18T00:31:03+5:30
मानव विकास मिशनच्या बसचे स्टेअरिंग अचानक निकामी झाल्याने अपघात होण्याची दाट शक्यता होती. मात्र, चालकाच्या सतर्कतेने अपघात टळला आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांसह २० प्रवासी बचावले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : मानव विकास मिशनच्या बसचे स्टेअरिंग अचानक निकामी झाल्याने अपघात होण्याची दाट शक्यता होती. मात्र, चालकाच्या सतर्कतेने अपघात टळला आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांसह २० प्रवासी बचावले.
मानव विकास मिशनची एमएच ०६-८८७१ क्रमांकाची बस कुरखेडा तालुक्यातील शेड्युल आटोपून गडचिरोलीला परत जात असताना कुरखेडा-देसाईगंज मार्गावरील गोविंदराव मुनघाटे महाविद्यालय जवळ सकाळी ११ वाजताच्या सुमारास अचानक गाडीचे स्टेअरिंग निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. यावेळी चालक सुखदेव सयाम यांनी प्रसंगावधान दाखवत गाडी थांबविली. यामुळे मोठा अपघात होता होता टळल्याने प्रवासी अपघातातून बचावल्याची माहिती या बसने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने दिली. नादुरुस्त गाडीतील प्रवाशांना ब्रह्मपुरी आगाराच्या एमएच ४०-९९२२ क्रमांकाच्या कुरखेडा-देसाईगंज बसमध्ये पुढील प्रवासासाठी बसविण्यात आले. मात्र, काही अंतर पुढे गेल्यानंतर गुरनोली फाट्याजवळ याही बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती थांबविण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना पुन्हा मनस्ताप सहन करावा लागला.