लाेंबकळणाऱ्या तारांमुळे अपघाताचा धाेका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:08 AM2021-02-06T05:08:47+5:302021-02-06T05:08:47+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क वैरागड : येथील प्राथमिक आराेग्य केंद्राच्या इमारतीची दीड वर्षांपूर्वी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले हाेते. हे ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : येथील प्राथमिक आराेग्य केंद्राच्या इमारतीची दीड वर्षांपूर्वी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले हाेते. हे काम अजूनही अपूर्ण आहे. वीजतारा एकमेकांना जाेडून वीजपुरवठा करण्यात आला आहे. एखाद्या दिवशी स्पार्किंग हाेऊन माेठी दुर्घटना हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वैरागड प्राथमिक आराेग्य केंद्राची दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा परिषदेने १५ लाख रुपये मंजूर केले. या निधीतून इमारत दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. मात्र निविदेत विद्युत फिटिंगचा समावेश नसल्याने विद्युत फिटिंगचे काम शिल्लक आहे. परिणामी एकमेकांना वायर जाेडून काम चालविले जात आहे. प्राथमिक आराेग्य केंद्रात प्रवेश करताच लाेंबकळणाऱ्या तारा नजरेस पडतात. १५ दिवसापूर्वी भंडारा येथील शासकीय रुग्णालयात स्पार्किंग हाेऊन लहान बालकांचा जीव गेला हाेता. अशी दुर्घटना वैरागड प्राथमिक आराेग्य केंद्रात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विद्युत फिटिंग करण्याची मागणी हाेत आहे. विद्युत फिटिंग झाली नसल्याने रुग्णालयात येणारे रुग्ण, आराेग्य कर्मचारी व डाॅक्टरांनाही त्रास हाेत आहे.
याबाबत वैरागड-मानापूर जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य संपत आळे यांना विचारणा केली असता, जिल्हा परिषदेच्या पुढच्या बैठकीत हा विषय चर्चेला घेऊ, असे सांगितले.
बाॅक्स.....
बाल संगाेपन केंद्रातून कारभार सुरू
प्राथमिक आराेग्य केंद्राच्या इमारतीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असल्याने मागील दीड वर्षांपासून माता व बाल संगाेपन केंद्राच्या इमारतीतून प्राथमिक आराेग्य केंद्राचा कारभार चालविला जात आहे. बाह्य रुग्ण तपासणी, आजारी रुग्ण व गराेदर मातांना बाल संगाेपन केंद्रातच भरती केले जाते.