तेंदूपत्ता संकलनाची लगबग वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 11:26 PM2019-05-03T23:26:49+5:302019-05-03T23:27:29+5:30
ग्रामीण व दुर्गम भागात तेंदूपत्ता संकलनाच्या कामाला सुरूवात झाली आहे. सकाळपासून दुपारी उशीरापर्यंत तेंदूपत्त्याचे संकलन करून जास्तीत जास्त मजुरी पाडण्यासाठी तेंदूपत्ता मजुरांची लगबग वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : ग्रामीण व दुर्गम भागात तेंदूपत्ता संकलनाच्या कामाला सुरूवात झाली आहे. सकाळपासून दुपारी उशीरापर्यंत तेंदूपत्त्याचे संकलन करून जास्तीत जास्त मजुरी पाडण्यासाठी तेंदूपत्ता मजुरांची लगबग वाढली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात तेंदूपत्त्याची मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. तसेच तेंदूपत्त्याचा दर्जाही चांगला आहे. त्यामुळे येथील तेंदूपत्त्याला राष्ट्रीय बाजारात चांगली मागणी आहे. जवळपास एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तेंदूपत्ता परिपक्व होत असल्याने तेंदूपत्ता संकलनाच्या कामाला सुरूवात झाली आहे. पेसा कायद्यांतर्गत तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार ग्रामसभांना दिले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास ९०० ग्रामसभा स्वत:हून तेंदूपत्ता संकलनाचे काम करीत आहेत.
उन्हाळ्यात ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध राहत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील मजूर तेंदूपत्ता संकलनासाठी दुर्गम भागात जातात. यापूर्वी तेंदूपत्ता संकलनाचे काम वन विभाग करीत होते. पेसा कायद्यानंतर मात्र ग्रामसभांना तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार देण्यात आल्याने काही ग्रामसभा स्वत:हून तेंदूपत्ता संकलन करीत आहेत. तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम जवळपास १५ दिवस चालतो. यातून प्रत्येक व्यक्ती पाच ते सहा हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त करते.
लोकसभेच्या आचारसंहितेमुळे ग्रामसभांचे कंत्राटदारांसोबत करारनामे करताना अडचणी आल्या होत्या. मात्र आचारसंहिता शिथील होण्याची प्रतीक्षा केल्यास तो पर्यंत तेंदूपत्त्याचा हंगाम हातून निघून गेला असता. त्यामुळे ग्रामसभांनी यातून मार्ग काढत कंत्राटदारासोबत करारनामे केले. त्यामुळे आता तेंदूपत्ता संकलनाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील चार दिवसात तेंदूपत्ता संकलनाला पुन्हा गती येणार आहे.
तेंदूपत्त्याचा दर्जा चांगला
यावर्षी कडक ऊन पडल्याने तेंदूपत्त्याचा दर्जा अतिशय चांगला आहे. त्यामुळे तेंदूपत्त्याचे अधिकाधिक संकलन करणे मजुरांना शक्य होत आहे. तेंदूपत्त्याचा दर्जा चांगला असल्यास कंत्राटदारालाही व्यापाऱ्याकडून चांगला भाव मिळणार आहे. त्यामुळे मजूर व कंत्राटदार सध्या समाधानी आहेत. बाहेरगावावरून तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या नागरिकांना जंगलातच झोपड्या उभारून राहावे लागते. मात्र मागील काही दिवसांपासून अधूनमधून वादळ वाºयासह पाऊस सुरू आहे. यामुळे नागरिकांचे हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.