आष्टी परिसरात रेतीसह मुरूम तस्करी जाेमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:25 AM2021-06-11T04:25:21+5:302021-06-11T04:25:21+5:30
आष्टी व परिसरात यंदा रेतीघाटांचे लिलाव झाले नाहीत. त्यामुळे विविध बांधकामांसाठी लागणारी रेती आणायची कुठून, असा प्रश्न नागरिकांसमाेर पडला ...
आष्टी व परिसरात यंदा रेतीघाटांचे लिलाव झाले नाहीत. त्यामुळे विविध बांधकामांसाठी लागणारी रेती आणायची कुठून, असा प्रश्न नागरिकांसमाेर पडला असतानाच रेती व मुरूम तस्कर पुढे सरसावले. अवैध रेती वाहतूक करून अवाजवी किमतीत रेती व मुरूम विक्री करण्याचा गाेरखधंदा सुरू केला. सध्या आष्टी येथे अवैध रेती व मुरूम तस्करीचा व्यवसाय जोमाने आणि दिवसाढवळ्या सुरू आहे. येथे मंडळ अधिकारी कार्यालय आहे. तसेच मंडळातील जवळपास सर्वच तलाठी याच ठिकाणी वास्तव्यास आहेत. तरीसुद्धा कारवाई का हाेत नाही, असा सवाल नागरिक करीत आहेत. काही दिवसांपूर्वी रेती तस्करी करणाऱ्या चार ट्रॅक्टर व एका जेसीबी मशीनच्या मालकावर तहसीलदारांनी दंड ठाेठावला हाेता. मात्र, चार दिवस गेल्यानंतर राजरोसपणे पुन्हा रेती व मुरूम तस्करांनी आपले बस्तान बसवले. घरकुलाच्या बांधकामासाठी तहसीलदारांनी अप्रत्यक्षपणे रेती वापरण्यासंदर्भात सांगितल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. परंतु, याचा गैरफायदा रेती तस्कर घेत आहेत. तस्करांवर कारवाई करण्यासाठी महसूल व खनिकर्म विभागाचे अधिकारी कानाडाेळा करीत असल्याने त्यांच्यावर परिसरातील नागरिक संशय व्यक्त करीत आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
बाॅक्स
माेकळ्या जागेत अनेकांनी केला रेतीसाठा
माेठमाेठ्या खासगी बांधकामांना रेती पुरविण्याचे काम आष्टी परिसरातील अनेक रेती तस्कर करीत आहेत. काही लाेकांनी माेकळ्या जागेत रेतीचा साठा करून ठेवला आहे. सदर रेती पावसाळ्यात चढ्या दराने विक्री हाेण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात रेतीची विक्री करण्यासाठी रेतीचे ढीग तयार केले जात आहेत. ही बाब बऱ्याच अधिकाऱ्यांना माहीत आहे. परंतु, कारवाई करण्यास कुणीही धजत नाही. बऱ्याच दिवसांपासून रेती तस्करीचा गाेरखधंदा जाेमात सुरू आहे. अशा रेती तस्करांवर कारवाई करण्याची गरज व्यक्त हाेत आहे.