गडचिरोलीत संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ५०० वाहन चालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 15:33 IST2020-03-29T15:33:14+5:302020-03-29T15:33:42+5:30
गडचिरोली पोलीस दलाने आतापर्यंत संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ५०० वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून २ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच एकूण ८० वाहने जप्त करण्यात आली आहेत.

गडचिरोलीत संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ५०० वाहन चालकांवर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : संचारबंदीच्या काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर गडचिरोली पोलीस दल कडक कारवाई करत आहे. यासाठी जिल्हाभरात ११ ठिकाणी आंतरजिल्हा चेकपोस्ट तर ४ ठिकाणी आंतरराज्य चेकपोस्टची उभारणी गडचिरोली पोलीस दलाने केली आहे. आतापर्यंत संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ५०० वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून २ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच एकूण ८० वाहने जप्त करण्यात आली आहेत. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर जिल्हाभरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये १० गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
नागरिकांनी संचारबंदीच्या काळात घरातच थांबून कोविड- १९ रोगाचा सामना करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन वारंवार करण्यात आले असताना देखील काही बेजबाबदार नागरिक केवळ हुल्लडबाजी करण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. अशा बेजबाबदार नागरिकांवर गडचिरोली पोलीस दल कडक कारवाई करत आहे. नागरिकांनी संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले असून यापुढे संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश सर्व पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.