अवैध दारू व तंबाखू विक्रेत्यांवर कारवाईबाबत नियाेजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:34 AM2021-04-12T04:34:59+5:302021-04-12T04:34:59+5:30
शहरासह तालुका दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याअनुषंगाने गडचिरोली पोलीस व मुक्तिपथची बैठक पार पडली. या बैठकीत ...
शहरासह तालुका दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याअनुषंगाने गडचिरोली पोलीस व मुक्तिपथची बैठक पार पडली. या बैठकीत गडचिरोली जिल्ह्यात कोरोना विषाणूचे संक्रमण टाळण्यासाठी गडचिरोली पोलीस स्टेशन अंतर्गत विशेष पथक तयार करून अवैध दारू व तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई करणे. शासनाच्या नियमांचे उल्लंघन करत दारूविक्रेत्यांच्या घरी दारू पिण्यासाठी गर्दी करणाऱ्यांवर कारवाई करणे, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांकडून ५ हजारांचा दंड वसूल करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर १ हजार २०० रुपयांचा दंड ठोठावणे. किराणा दुकानांतून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांकडून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करणे. अवैध दारू व तंबाखूची तस्करी व विक्री करणाऱ्यांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीला मुक्तिपथ अभियानाचे संचालक डॉ. मयूर गुप्ता, ठाणेदार दामदेव मंडलवार, उपसंचालक संतोष सावळकर, विलास निंबोरकर, मुक्तिपथ तालुका संघटक अमोल वाकुडकर, उपसंघटक रेवनाथ मेश्राम, गणेश कोलगिरे उपस्थित होते.
बाॅक्स
व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करणार
गडचिरोली तालुक्यातील अवैध दारूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शहरासह पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या भागातील अवैध दारू व तंबाखू विक्रेत्यांवर कायद्यानुसार कारवाई करत दारू व तंबाखूमुक्त तालुका निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार यांनी सांगितले.