चार तालुक्यात खर्ऱ्याविरूद्ध कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 05:00 AM2020-05-09T05:00:00+5:302020-05-09T05:00:30+5:30
मुक्तिपथ तालुका चमूने ठिकठिकाणी नगर पालिका, नगर पंचायत, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण पथक, ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने सातत्याने धाडसत्र राबविले जात आहे. गडचिरोली, वडसा, आरमोरी, चामोर्शी अहेरी येथे मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. त्यामुळे शहरांमध्ये अशा विक्रीला आळा बसला. पण गावांमध्ये अजूनही लपून-छपून खर्रा विक्री होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मुक्तिपथ तालुका चमूने प्रशासनाच्या सहकार्यातून तंबाखूजन्य पदार्थासह घोटून तयार असलेला खर्रा जप्त केला. कोरची, चामोर्शी, एटापल्ली, कुरखेडा येथे या कारवाया करण्यात आल्या.
मुक्तिपथ तालुका चमूने ठिकठिकाणी नगर पालिका, नगर पंचायत, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण पथक, ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने सातत्याने धाडसत्र राबविले जात आहे. गडचिरोली, वडसा, आरमोरी, चामोर्शी अहेरी येथे मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. त्यामुळे शहरांमध्ये अशा विक्रीला आळा बसला. पण गावांमध्ये अजूनही लपून-छपून खर्रा विक्री होत आहे. अशा गावांमधील दुकाने शोधून काढत सर्व साहित्य मुक्तिपथ व ग्रामपंचायत प्रशासनाद्वारे सातत्याने नष्ट केले जात आहे.
एटापल्ली तालुक्यातील एकरा बुज या गावी दुकानांमध्ये खर्रा विकला जात होता. गावातील भूमैया आणि पोलीस पाटील यांनी ही माहिती मुक्तिपथ तालुका चमुला दिली. तालुका चमूने या दोघांच्या सहकार्याने येथील चार दुकाने तपासली असता घोटून तयार असलेले एकूण ११० खर्रे सापडले. हा सर्व मुद्देमाल, सोबतच इतरही तंबाखूजन्य पदार्थ ताब्यात घेत त्यांची होळी करण्यात आली.
कुरखेडा तालुक्यातील तळेगाव, वारवी आणि अंतरगाव येथे खर्राविक्री होत आहे. पानठेले उघडून खर्राविक्री होत असल्याचे निदर्शनास आले. हा खर्रा व इतरही साहित्य असा पाच हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेत नष्ट करण्यात आला.
चामोर्शी तालुक्यातील वाघदरा आणि कुरुड येथे पानठेलाधारकांच्या घरी धाड मारली असता खऱ्याचा मोठा साठा सापडला. वाघदारा येथे ३० तर कुरुड येथून ४० खर्रे मुक्तिपथने नष्ट केले. तंबाखूजन्य पदार्थही ताब्यात घेत त्याचीही विल्हेवाट लावली.
कोरची तालुक्यातून ४२ खर्रे जप्त
कोरची तालुक्यातील पांढरीगोटा येथे चंदनसाय हा इसम घरीच खर्राविक्री करीत असल्याची माहिती मिळाली. मुक्तिपथ कार्यकर्त्यांनी धाड मारली असता घोटून प्लॅस्टिक पन्नीमध्ये बांधून असलेले ४२ खर्रे सापडले. सोबतच खर्रा बनविण्यासाठी लागणारे साहित्य व सुगंधित तंबाखूदेखील सापडला. हा सर्व मुद्देमाल नष्ट करण्यात आला. ४० ते ५० रुपयांपर्यंत घरपोच हे खर्रे विकले जात असल्याचे विक्रेत्याने सांगितले.