तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या सहा दुकानदारांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:36 AM2021-04-25T04:36:22+5:302021-04-25T04:36:22+5:30
तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकल्यास कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे पानठेले बंद ठेवण्याचे व किराणा ...
तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकल्यास कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे पानठेले बंद ठेवण्याचे व किराणा दुकानातून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याचे आवाहन केले आहे. या नियमाचे उल्लंघन होत असल्याचे लक्षात येताच भामरागड नगरपंचायत व मुक्तीपथने शहरात मोहीम राबवित एकूण ९ किराणा दुकानांची तपासणी केली. दरम्यान, सहा दुकानांतून तंबाखू, बिडी, बैलजोडी तंबाखू, तपकीर, खर्रा पन्नी, तसेच सिगारेट, प्लास्टिक पिशव्या, सुगंधित तंबाखूचे लहान-मोठे ८ पॉकेट असा एकूण १२ हजार २३४ रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आला. याप्रकरणी एकूण ३० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच यापुढे दुकानात तंबाखूजन्य पदार्थ, प्लास्टिक पिशव्या, कॅरीबॅग यांची साठवणूक किंवा विक्री करताना आढळून आल्यास दुकान सील करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. ही कारवाई न.पं.चे लेखापाल नीलकंठ फुसे, मुक्तीपथचे आबिद शेख, कर्मचारी मनीष मडावी, रवी गुडीपाका, जितेंद्र मडावी, महेंद्र कुसराम, नरेश मडावी, राजेंद्र पिपरे यांनी केली.