गडचिरोलीत विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 07:25 PM2020-09-18T19:25:27+5:302020-09-18T19:27:00+5:30
कोरोेना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नगर पंचायत प्रशासनाने एटापल्ली, धानोरा, देसाईगंज, कोरची येथे दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या अनेक नागरिकांवर गडचिरोली शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत दंडात्मक कारवाई करण्यात आली.
कोरोेना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नगर पंचायत प्रशासनाने एटापल्ली, धानोरा, देसाईगंज, कोरची येथे दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे.
एटापल्ली - येथील मुख्य रस्त्यावर १५ सप्टेंबर रोजी मंगळवारला आठवडी बाजार भरला. दरम्यान या ठिकाणी महसूल, पोलीस विभाग व नगर पंचायतीच्या वतीने संयुक्त कारवाई राबवून मास्क न वापरणाºया विक्रेते व ग्राहकांकडून दंड वसूल केला. यावेळी एकूण १२ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करून त्यांना पावती देण्यात आली. या कारवाईमुळे विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांचे धाबे दणाणले आहेत.
धानोरा - येथे मास्कविना फिरणाऱ्या नागरिकांवर १५ सप्टेंबर रोजी दंडात्मक कारवाई करण्यात आली. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर करण्यात यावा, अन्यथा दंड आकारण्यात येईल, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला. दरम्यान नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने मोहीम राबवून नागरिकांमध्ये जागृती मास्क वापराबाबत करण्यात आली. विनामास्क आढळलेल्या सात व्यक्तींवर प्रत्येकी २०० रुपये प्रमाणे १ हजार ४०० रुपये दंड आकारण्यात आले. यामध्ये काही दुकानदार सुद्धा विनामास्क आढळून आले. शुक्रवारी भरणारा आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार असल्याच्या सूचना नगर पंचायतीने काढल्या आहेत. बाहेरच्या विक्रेत्यांना धानोरा शहरात येऊन दुकान लावण्याची परवानगी नाही. कोरोना संसर्ग आटोक्यात येईपर्यंत आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. स्थानिक विक्रेते येथे दररोज दुकान लावतील, असे मुख्याधिकाºयांनी सांगितले. कारवाईदरम्यान न.पं.मुख्याधिकारी नरेंद्र बेंदरे, कर्मचारी गुलाब ठाकरे, सत्यवान गुरनुले, देवनाथ गावतुरे, मुरलीधर बोगा, उमेश नागापुरे आदी उपस्थित होते.
देसाईगंज - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देसाईगंज नगर परिषद प्रशासनाने बुधवारपासून मास्क न लावता फिरताना लोकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली आहे. मात्र विलगीकरणात असलेले नागरिक कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्याने आवश्यक त्या प्रमाणात भीती नव्हती. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर जिल्हा सीमेवरील चेकपोस्ट हटविण्यात आले. दरम्यान मुक्त संचार वाढल्याने कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले. प्रादुर्भाव आणखी वाढू नये, या उद्देशाने मुख्याधिकारी कुलभूषण रामटेके यांच्या नेतृत्वात न.पं.च्या सर्व कर्मचाºयांनी वेगवेगळ गट करून मास्क न घालता सैराटपणे फिरणाºया २५५ नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून ३१ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला. नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवावे, मास्कचा वापर करावा, असे मुख्याधिकारी रामटेके यांनी म्हटले आहे.
कोरची - येथील नगर पंचायत प्रशासनाने शहरात विनामास्क फिरणाºया १४ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून एकूण १ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई उपमुख्याधिकारी व्ही.व्ही.हाके यांच्या नेतृत्वात सुधीर ढोले, जयपाल मोहुर्ले, नरेंद्र कोतकोंडावार, विजय जेंगठे, अनिल वाढई, उत्तम बागडेरिया यांनी केली आहे. नगर पंचायतीने विनामास्क फिरणाºयांकडून आतापर्यंत ६ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.