कर न भरल्यास जप्तीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 01:42 AM2018-03-22T01:42:39+5:302018-03-22T01:42:39+5:30
चामोर्शी नगर पंचायतीच्या हद्दीत संपूर्ण शहर, शंकरपूर, सावरहेटी, दहेगाव आदी भागाचा समावेश आहे. शहरातील अनेक नागरिकांनी चालू वर्षातील व मागील थकीत मालमत्ता कराचा अद्यापही भरणा केलेला नाही.
ऑनलाईन लोकमत
चामोर्शी : चामोर्शी नगर पंचायतीच्या हद्दीत संपूर्ण शहर, शंकरपूर, सावरहेटी, दहेगाव आदी भागाचा समावेश आहे. शहरातील अनेक नागरिकांनी चालू वर्षातील व मागील थकीत मालमत्ता कराचा अद्यापही भरणा केलेला नाही. नागरिकांनी तत्काळ मालमत्ता कराचा भरणा करावा अन्यथा थकबाकीदाराविरोधात २३ मार्चपासून शुक्रवारपासून जप्तीची कारवाई करणार, अशी माहिती चामोर्शी नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी अर्शिया जुही यांनी लोकमतशी बोलताना दिली.
नगर पंचायतीच्या मालमत्ता करात चालू व थकीत गृहकर, पाणीकर, आरोग्य कर, खास पाणीकर, दिवाबत्तीकर, गाडेभाडे कर आदींचा समावेश आहे. सदर कर मार्च २०१८ पर्यंत न भरल्यास २३ मार्चपासून नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने धडक मोहीम राबवून जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी नगर पंचायत कार्यालयात येऊन मालमत्ता कराचा भरणा करावा व नगर पंचायत प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी जुही यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून नगर पंचायतीचे कर्मचारी वॉर्डावॉर्डांत फिरून मालमत्ता व पाणी कराची वसुली करीत आहेत. तसेच शहरातील अनेक नागरिक स्वत: नगर पंचायतीच्या कार्यालयात जाऊन कराचा भरणा करीत आहेत. शासन व जिल्हा प्रशासनाकडून ३१ मार्च २०१८ पर्यंत चालू आर्थिक वर्षातील कर व मागील थकबाकी १०० टक्के वसुल करण्यात यावी, असे निर्देश जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायतींना देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने काही नगर पालिका व नगर पंचायती कामाला लागल्या आहेत.
चामोर्शीकरांवर ७८ लाखांची थकबाकी
चामोर्शी नगर पंचायतीच्या मालमत्ता कराची मागील थकबाकीची रक्कम २० लाख ५६ हजार ५५९ तर चालू वर्षातील ३५ लाख ८२ हजार ५०६ रूपये कुटुंबधारकांवर आहे. थकीत पाणीकर १० लाख ३ हजार ८५८, चालू वर्षातील पाणी कर ११ लाख ९३ हजार १६० रूपये आहे. मागील थकबाकी व चालू वर्षातील मिळून मालमत्ता व पाणी कराची एकूण ७८ लाख ३६ हजार ८३ रूपयांची नगर पंचायतीची मागणी आहे. १०० टक्के कर वसुली करण्यासाठी मुख्याधिकाºयांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्या अनुषंगाने वॉर्डावॉर्डांत नगर पंचायतीचे कर्मचारी फिरत आहेत.