कर्ज वाटपास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर होणार कारवाई
By admin | Published: June 3, 2017 01:09 AM2017-06-03T01:09:27+5:302017-06-03T01:09:27+5:30
प्रत्येक बँकेने शेतकऱ्याला कर्ज द्यावे यासाठी बँकांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे.
देसाईगंज व चामोर्शीत सभा : जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; पीक कर्ज वितरणाचा तालुकानिहाय आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज/चामोर्शी : प्रत्येक बँकेने शेतकऱ्याला कर्ज द्यावे यासाठी बँकांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. तरीही काही बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे. कर्ज वाटपास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर प्रशासकीय कारवाई केली जाईल, असे निर्देश जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी दिले. जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी चामोर्शी व देसाईगंज तहसील कार्यालयात बैठक घेऊन कर्जवाटपाचा आढावा घेतला. याप्रसंगी ते बोलत होते.
देसाईगंज येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा, कोरची तालुक्यातील सर्व तहसीलदार गट विकास अधिकारी, कृषी अधिकारी, बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. २०१७-१८ या वर्षातील नियोजनाबाबत माहिती देऊन उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश दिले. बँक अधिकाऱ्यांनी पॉवर पार्इंट प्रेझेन्टेशनद्वारे लिड बँकेचे मॅनेजर खांडेकर यांच्या मार्गदर्शनात कर्ज वाटपाबाबतची माहिती सादर केली. यावेळी उपविभागीय अधिकारी नान्हे, तहसीलदार सोनवाणे, धाईत, चरडे, नायब तहसीलदार उपेश अंबादे, सहायक गट विकास अधिकारी सुनिता म्हरस्कोल्हे, कृषी अधिकारी कांबळे, भेडे उपस्थित होते.
देसाईगंज येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात चामोर्शी व मुलचेरा या दोन तालुक्यातील सर्व बँक व्यवस्थापकांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर, तहसीलदार अरूण येरचे, मुलचेराचे तहसीलदार अनिरूध्द कांबळे, संवर्ग विकास अधिकारी गोविंदा खामकर, मुख्याधिकारी आर्शीया जुही, लिड बँकेचे मॅनेजर आर. एस. खांडेकर, उपविभागीय कृषी अधिकारी एस. के. सोनटक्के, तालुका कृषी अधिकारी व्ही. एस. राजपूत, मुलचेराचे तालुका कृषी अधिकारी एस. डी. सुतार, कृषी अधिकारी के. बी. दुधे, सहायक व्यवस्थापक आर. एस. गावंडे, प्रबंधक, कैलाश मडावी, अभिषेक देव, बँक आॅफ महाराष्ट्राचे व्यवस्थापक, अंतरीक्ष सिंग, आर. एस. फरकाडे, एस. व्ही. हेडाऊ, ए. एस. ढावल, एन. के. बोरकर, व्ही. एस. हेडाऊ, ए. के. काझी, पी. एम. बोदलकर, पी. एम. धाईत, एस. व्ही. सरपे, नायब तहसीलदार देवेंद्र दहिकर, एस. के. बावणे, तनगुलवार आदी उपस्थित होते. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले नाही, अशा शेतकऱ्यांची यादी तहसीलदारांनी तयार करून बँकांना उपलब्ध करून द्यावी, पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची गावनिहाय यादी तयार करावी, पीक कर्ज घेणाऱ्या लाभार्थ्यांना अर्जाकरिता अर्ज करू नये, संपूर्ण कागदपत्रे जोडून अर्जाचा बंच तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
अशी केली जाणार जनजागृती
तहसीलदार संवर्ग विकास अधिकारी, कृषी अधिकारी महिला बचत गट, कृषी मित्र, महा ई-सेवा केंद्र यांचे पथक तयार करून मार्गदर्शन शिबिर आयोजित करणे, लाभार्थ्यांचे संपूर्ण कागदपत्रे भरून घेणे, वनहक्क पट्टेधारकांना पीक कर्ज मंजूर करणे, ग्रामपंचायत स्तरावर पीक कर्जाबाबत बॅनर लावून अधिकाधिक प्रमाणात जनजागृती केली जाणार आहे. प्रत्येक बँकेला दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.