विद्यार्थ्यांची कागदपत्रे अडवाल तर महाविद्यालयांवर कारवाई !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 12:43 PM2024-09-05T12:43:38+5:302024-09-05T12:44:52+5:30
जिल्ह्यात शिष्यवृत्तीचे वाटप : लाभ न मिळाल्यास स्टेटस तपासावा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्यात २०२१-२२ पासून अनेक जिल्ह्यांत महाविद्यालयांना शिष्यवृत्ती प्राप्त झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बँकखात्यात शिष्यवृत्ती जमा झालेली नाही. जिल्ह्यात मात्र जवळपास सर्वच महाविद्यालयांना शिष्यवृत्तीचे वितरण झालेले आहे.
शिष्यवृत्ती प्राप्त झालेली नाही. या कारणास्तव महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची अडवणूक केली जात असेल, तर अशा महाविद्यालयांवर कारवाई केली जाणार आहे. आदिवासी विकास विभाग व समाजकल्याण विभागातर्फे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.
शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर
जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर त्यांची शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यात आलेली आहे. एकूण शिष्यवृत्तीच्या ही ६० टक्के रक्कम आहे.
फॉर्म आधी भरल्यास शिष्यवृत्ती मिळते लवकर
ज्या महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे फॉर्म सुरुवातीलाच भरले, त्या महाविद्यालयांना लवकर म्हणजेच पहिल्यांदाच शिष्यवृती वितरीत केली जाते. शासनाकडून लवकर निधी मंजूर झाल्यास प्राधान्यक्रमानुसार शिष्यवृत्ती लवकर वितरीत केली जाते.
व्यावसायिकची शिष्यवृत्ती रेंगाळली?
क्रमिक अभ्यासक्रमाची शिष्यवृत्ती दरवर्षी विद्यार्थ्यांना दोन हप्त्यांत जमा केली जाते. मात्र व्यावसायिक अभ्यासक्रमाची शिष्यवृत्ती निधीअभावी रेंगाळण्याची शक्यता असते.
"ज्या महाविद्यालयांची शिष्यवृत्ती रखडलेली आहे, त्यांनी समाजकल्याण विभागाशी संपर्क साधून लॉगिन आयडीद्वारे आपला स्टेटस चेक करून घ्यावा. शिष्यवृत्ती प्रलंबित असेल तर त्यांचा पाठपुरावा शासनाकडे केला जाईल."
- डॉ. सचिन मडावी, सहायक आयुक्त, समाजकल्याण