मुनघाटे महाविद्यालयाला व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 10:38 PM2019-02-04T22:38:21+5:302019-02-04T22:38:36+5:30
दंडकारण्य शिक्षण संस्थेद्वारा संचालित कुरखेडा येथील गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयास सन २०१७-१८ चा राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व सहाय्य विभागातर्फे दिला जाणारा महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार नुकताच चंद्रपूर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात प्रदान करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दंडकारण्य शिक्षण संस्थेद्वारा संचालित कुरखेडा येथील गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयास सन २०१७-१८ चा राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व सहाय्य विभागातर्फे दिला जाणारा महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार नुकताच चंद्रपूर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात प्रदान करण्यात आला.
२ व ३ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर येथे राज्यस्तरीय व्यसनमुक्त साहित्य संमेलन पार पडले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक डॉ. अभय बंग होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे वित्त नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, मराठी अभिनेत्री अनिता दाते आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांनी हा व्यसनमुक्ती पुरस्कार सपत्नीक स्वीकारला. रोख ३० हजार व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मुक्तीपथच्या व्यसनमुक्ती जनजागृती चळवळीत कुरखेडाच्या मुनघाटे महाविद्यालयाने भरीव काम केले. या कार्याची दखल घेऊन सदर महाविद्यालयाला हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार मिळाल्याने व्यसनमुक्तीचे कार्य महाविद्यालयाकडून आणखी जोमाने करणार, अशी प्रतिक्रिया प्राचार्य डॉ. मुनघाटे यांनी दिली.