बौद्धधम्माच्या दीक्षेबरोबरच प्रत्यक्ष आचरणही महत्त्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 10:34 PM2019-03-03T22:34:51+5:302019-03-03T22:35:38+5:30
देशभरातील लाखो नागरिकांनी बौद्धधम्म स्वीकारला आहे. मात्र अनेक कुटुंब बौद्धधम्मानुसार आचरण करीत नसल्याची शोकांतिका आहे. जो धम्म आपण स्वीकारला, त्या धम्माचे आचरण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपल्या आचारणातून बौद्धधम्माची ओळख समाजाला करून द्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : देशभरातील लाखो नागरिकांनी बौद्धधम्म स्वीकारला आहे. मात्र अनेक कुटुंब बौद्धधम्मानुसार आचरण करीत नसल्याची शोकांतिका आहे. जो धम्म आपण स्वीकारला, त्या धम्माचे आचरण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपल्या आचारणातून बौद्धधम्माची ओळख समाजाला करून द्या. समाजात बौद्धधम्म रूजविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी केले.
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा गडचिरोली यांच्या वतीने गडचिरोली येथे बौद्धधम्म परिषद व धम्म दीक्षा सोहळ्याचे आयोजन रविवारी करण्यात आले. या परिषदेचे उद्घाटन भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बौद्ध महासभेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष सी. पी. शेंडे, जयसेन गवई, अॅड. एस. एस. वानखेडे, यू. जी. बोराडे, अनिल मेश्राम, भिकाजी कांबळे, देवेंद्र मेश्राम, वामन सरदार, रवी भगत, सेवचंद्र नागदेवते, देवराव मेश्राम, जनार्धन खोब्रागडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे मार्गदर्शन करताना भिमराव आंबेडकर म्हणाले, १२०० वर्षांपूर्वी भारतात बौद्धधम्माचा प्रचार झाला होता. अनेकांनी बौद्धधम्म स्वीकारला होता. मात्र प्रतिक्रांती होऊन काही वर्षातच बौद्धधम्म लुप्त पावला. बौद्धधम्माचे विचार आचरणात न आणल्याने ही बाब घडली आहे. इतिहासाने दिलेला हा धडा प्रत्येक बौद्ध अनुयानाने शिकला पाहिजे. बौद्धधम्म आचरणात आणून तो पुढील पिढीमध्ये रूजविणे आवश्यक आहे. बौद्धधम्माच्या प्रचारात अनेक राजकीय अडथळे आहेत. या अडथळ्यांची शर्यत पार करून बौद्धधम्माचा प्रचार करायचा आहे. यासाठी बौद्ध अनुयांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन आंबेडकर यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान धम्म दीक्षा सोहळा पार पाडला. ११ उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविक प्रा. गौतम डांगे, संचालन तुलाराम राऊत तर आभार अनिल मेश्राम यांनी मानले.