'अधुरा सपना पुरा करेंगे...' वांडोली चकमकीनंतर नक्षल्यांची आगपाखड!
By संजय तिपाले | Published: August 10, 2024 09:26 PM2024-08-10T21:26:53+5:302024-08-10T21:27:02+5:30
पत्रकातून इशारा: मौल्यवान लोहखनीज कवडीमोल दराने विकण्याचा घाट, सत्ताधाऱ्यांवर आरोप
संजय तिपाले/गडचिरोली
गडचिरोली : छत्तीसगड सीमेवरील वांडाेलीच्या घनदाट जंगलात माओवादी व पोलिसांतील चकमकीत १२ माओवादी ठार झाले होते. या घटनेनंतर तीन आठवड्यांनी १० ऑगस्ट रोजी पत्रक जारी करुन 'अधुरा सपना पुरा करेंगे...' असा टोकाचा इशारा दिला आहे. लोहखनिजावर सरकारचा डोळा असून कवडीमोल दराने ते विकण्याचा घाट असल्याचा आरोप करत आगपाखड केली आहे.
एटापल्ली तालुक्यातील जारावंडी ठाणे हद्दीत १७ जुलै रोजी वांडोली गावानजीक सी- ६० जवान व नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. यात तीन मोठ्या नेत्यांसह कसनसूर,कोरची,टिपागड, चातगाव दलमलचे १२ नक्षलवादी ठार झाले होते. या चकमकीनंतर उत्तर गडचिरोलीतील नक्षलवादी चळवळ संपुष्टात आल्याचे पोलिसांनी जाहीर केले होते. त्यानंतर तब्बल २३ दिवसांनी नक्षलवाद्यांच्या पश्चिम सब झोनल ब्युरोचा प्रवक्ता श्रीनिवास याने १० ऑगस्ट रोजी पत्रक जारी केले आहे. यामध्ये चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांच्या नावाचा उल्लेख असून चकमकीवर प्रश्न उपस्थित करून राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. जिल्ह्यात असलेले मौल्यवान खनिज देशातील आणि विदेशातील उद्योगपतींना कवडीमोल दरात देण्याचा घाट असल्याचा दावा केला आहे. १७ जुलै रोजी अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत लोह प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी आले होते. नेमकी त्याच दिवशी संधी साधून ही चकमक घडविण्यात आली, असा आरोपही पत्रकात करण्यात आला आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी सन्मानपूर्वक नातेवाईकांना द्यावेत, अशी मागणीही केली आहे.
वांडोली चकमकीनंतर मृत नक्षलवाद्यांच्या नातेवाईकांशी संपर्क केला. आतापर्यंत ९ नक्षलवाद्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना स्वखर्चातून सुपूर्द केले आहेत. उर्वरित तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह छत्तीसगडमधील असून त्यांच्या नातेवाईकांना संपर्क करण्यात आला आहे. त्यांचा निरोप येतात हे देखील मृतदेह पोहोचवून देण्यात येतील. नक्षल्यांची चोहोबाजूंनी कोंडी झाली आहे, त्यामुळे नैराश्येतून ते आरोप करत आहेत.
- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली