आदिवासींनो, शिक्षणाकडे वळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 11:17 PM2018-03-11T23:17:22+5:302018-03-11T23:17:22+5:30
शिक्षणातून माणसाला शहाणपण व संस्कार मिळतात. त्यामुळे आदिवासी नागरिकांनी शिक्षणाची कास धरून आपल्या पाल्यांना शिक्षणाकडे वळवावे.
ऑनलाईन लोकमत
सिरोंचा : शिक्षणातून माणसाला शहाणपण व संस्कार मिळतात. त्यामुळे आदिवासी नागरिकांनी शिक्षणाची कास धरून आपल्या पाल्यांना शिक्षणाकडे वळवावे. शिक्षणातूनच आदिवासी नागरिकांचा विकास शक्य आहे, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.
वीर बाबुराव शेडमाके व भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याची स्थापना व सामाजिक प्रबोधन मेळाव्याचे आयोजन येथील आसरअल्ली मार्गावरील गोटूलभूमीत करण्यात आली. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर जि.प.च्या बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, सिरोंचा पं.स.चे उपसभापती रिक्कुला कृष्णमूर्ती आदी उपस्थित होते.
याप्रसंगी धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते आसरअल्ली मार्गावरील गोटूलभूमीत वीर बाबुराव शेडमाके व भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यांची स्थापना करण्यात आली. याप्रसंगी धर्मरावबाबा आत्राम यांनी संघटनेच्या नावावर काही लोक आदिवासी नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. अशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे, असे सांगितले. यावेळी भाग्यश्री आत्राम व इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.