आदिवासींनी हक्क कायम ठेवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2016 12:53 AM2016-06-22T00:53:14+5:302016-06-22T00:53:14+5:30

आदिवासी बांधवांचे नैसर्गिक अधिकार हे प्रशासन धनदांडगे व कारखानदारांच्या घशात ओतत आहे.

Adivasi rights should be maintained | आदिवासींनी हक्क कायम ठेवावे

आदिवासींनी हक्क कायम ठेवावे

googlenewsNext

अशोक श्रीमाली यांचे आवाहन : गडचिरोलीत आदिवासींची राज्यस्तरीय कार्यशाळा
गडचिरोली : आदिवासी बांधवांचे नैसर्गिक अधिकार हे प्रशासन धनदांडगे व कारखानदारांच्या घशात ओतत आहे. आदिवासींनी निमूटपणे बघ्याची भूमिका न घेता, स्वत:च्या हक्काचे संरक्षण करून आपले अधिकार व हक्क कायम ठेवण्यासाठी जागरूक झाले पाहिजे, असे आवाहन गुजरात येथील विचारवंत अशोक श्रीमाली यांनी केले.
क्रांतिवीर बिरसा मुंडा व बाबुराव मडावी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ समाज संस्था सप्ताहदरम्यान रविवारी आयोजित एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेत ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या कार्यशाळेचे उद्घाटन वर्धाचे आदिवासी सेवक महेंद्र शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच जीजाबाई अलाम, जि. प. सदस्य पद्माकर मानकर, अ‍ॅड. सुखरंजन उसेंडी, पत्रकार रोहिदास राऊत, काँग्रेस कार्यकर्ते संतोष आत्राम, गोंडवाना गोंड महासभेचे शालिक मानकर, हलबी संघटनेचे कार्यकर्ते पितेश येरमे, सुखदेव शेडमाके, रामदास जराते, संतोष मडावी, कार्यक्रमाचे आयोजक कुसुम अलाम आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना अशोक श्रीमाली म्हणाले, शतकानुशतकापासून आदिवासींची पिळवणूक सुरूच आहे. समता, न्याय केवळ भाषणापूर्ते मर्यादित आहे. अन्यायाच्या विरोधात येथील आदिवासी लोकप्रतिनिधींनी कधीही आवाज उठविला नाही. त्यामुळे आदिवासींची पिळवणूक थांबली नाही. आदिवासींनी स्वत:च्या उत्थानाकरिता पुढे आले पाहिजे, असेही ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार शासनाकडे केवळ देखभालीचे अधिकार आहे. मात्र आदिवासींच्या वस्तूंवर शासन स्वामित्व गाजवतो. कारखानदार येथील आदिवासींचा खजिना लुटून नेत आहे. ही लूट थांबवायची असेल तर आदिवासींनी संघटीत होऊन लढा दिला पाहिजे, असे आवाहनही श्रीमाली यांनी यावेळी केले.
महेश राऊत यांनी पेसा कायद्याअंतर्गत आदिवासींना मिळालेल्या अधिकाराची विस्तृतपणे माहिती दिली. कुसूम अलाम यांनी स्वातंत्र्यपूर्वीचे बिरसा मुंडा व स्वातंत्र्यनंतर समाज लढा उभारणारे बाबुराव मडावी, यांचा संघर्ष विशद केला. या दोन्ही क्रांतिकारकांचा संघर्ष आदिवासींपुढे न्यावा, असे आवाहन केले.
यावेळी देवाजी कुलसंगे, मदन मडावी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी गौरव अलाम, तुषार कुळमेथे, वृषभ धुर्वे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला गडचिरोली तालुक्यातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Adivasi rights should be maintained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.