नगर पंचायतीत आदिवासी विद्यार्थी संघाची मुसंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2022 04:31 PM2022-01-21T16:31:00+5:302022-01-21T16:40:24+5:30
जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, माजी आ.दीपक आत्राम यांच्या नेतृत्वात आदिवासी विद्यार्थी संघाने चांगलीच मुसंडी मारली. काँग्रेस पक्षाशी सलगी असतानाही आपले स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवण्यात आविसंने यश मिळविले.
गडचिरोली : गेल्या २१ डिसेंबर आणि १८ जानेवारी रोजी दोन टप्प्यात झालेल्या जिल्ह्यातील ९ नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यात काँग्रेसने सर्वाधिक ३९ जागांवर विजय मिळवला. गेल्यावेळच्या तुलनेत ३ जागा गमावूनही सर्वाधिक जागा पटकावणारा पक्ष म्हणून काँग्रेसला बहुमान मिळाला. दुसरीकडे भाजपला १२ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ६ जागा गमवाव्या लागल्या. शिवसेने २ जागा अधिकच्या मिळवत बेरजेचे गणित जुळविले. सर्वाधिक लाभ आदिवासी विद्यार्थी सेनेला झाला. गेल्यावेळी अवघ्या ४ जागा पटकावणाऱ्या आविसने यावेळी २० जागा पटकावत मुसंडी मारली आहे.
दरम्यान कुरखेडा (भाजप), सिरोंचा (आविसं), धानोरा (काँग्रेस) आणि मुलचेरा (राष्ट्रवादी काँग्रेस) वगळता इतर ठिकाणी स्पष्ट बहुमत नसल्याने कोणत्या पक्षाची सत्ता स्थापित होणार याचे चित्र स्पष्ट नाही. काँग्रेसखालोखाल भाजपला दुसऱ्या क्रमांकाच्या ३६ जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसला २६ तर शिवसेनेच्या वाट्याला १४ जागा आल्या आहेत.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाची स्थिती फारशी चांगली नसताना ना. विजय वडेट्टीवार यांनी पक्षाचे संपर्क मंत्री म्हणून काही दिवसांपासून गडचिरोलीच्या राजकारणात लक्ष घातले. अलिकडेच संघटनात्मक बदलही केले. जिल्हाध्यक्षपदाची धुरा महेंद्र ब्राह्मणवाडे या युवा जिल्हाध्यक्षाकडे सोपविली. त्यामुळे पक्षाला सावरण्यास मदत झाली. याच पद्धतीने शिवसेनेतही संघटनात्मक बदल झाले. किरण पांडव यांच्याकडे जिल्हा समन्वयकाची जबाबदारी देऊन पक्षबांधणी झाल्याने शिवसेनेला बऱ्याच जागी यश मिळाले.
जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, माजी आ.दीपक आत्राम यांच्या नेतृत्वात आदिवासी विद्यार्थी संघाने चांगलीच मुसंडी मारली. काँग्रेस पक्षाशी सलगी असतानाही आपले स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवण्यात आविसंने यश मिळविले.
कुरखेडात भाजपलाच कौल
कूरखेडा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण १७ जागेपैकी भाजपने ९ जागेवर तर शिवसेना-काँग्रेस आघाडीने ८ जागांवर विजय मिळविला आहे. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याने पुन्हा एकदा भाजपची सत्ता नगर पंचायतवर कायम राहणार आहे.
निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये प्रभाग क्रमांक १ मधून शिवसेनेची अनिता बोरकर, प्रभाग क्रमांक २ मधून भाजप उमेदवार रामभाऊ वैद्य, प्रभाग क्र ३ मधून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांचे बंधू जयेंद्र सिंह चंदेल, प्रभाग क्रमांक ४ मधून काँग्रेसच्या प्राची कैलाश धोंडणे, प्रभाग क्रमांक ५ मध्ये काँग्रेसच्या कुंदा तितीरमारे, प्रभाग क्रमांक ६ मध्ये भाजप उमेदवार सागर निरंकारी, प्रभाग क्रमांक ७ मध्ये भाजप उमेदवार दुर्गा गोठेफोडे, प्रभाग क्रमांक ८ मध्ये भाजपच्या जयश्री रासेकर, प्रभाग क्रमांक ९ मधून शिवसेना उमेदवार अशोक कंगाले, प्रभाग क्रमांक १० मध्ये भाजपाच्या अल्का गिरडकर, प्रभाग क्रमांक ११ मध्ये कांताबाई मठ्ठे, प्रभाग क्रमांक १२ मध्ये शिवसेनेचे आशिष काळे, प्रभाग क्रमांक १३ मध्ये काँग्रेसच्या हेमलता नंदेश्वर, प्रभाग क्रमांक १४ मध्ये भाजप उमेदवार ॲड. उमेश वालदे, प्रभाग क्रमांक १५ मधून अतुल झोडे, प्रभाग क्रमांक १६ मध्ये भाजप उमेदवार गौरी उईके, प्रभाग क्रमांक १७ मध्ये भाजप अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबलू हूसैनी (कलाम शेख) यांचा समावेश आहे.
चामोर्शीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष
चामोर्शी नगर पंचायतीत काँग्रेसने सर्वाधिक ८ जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने ५, भाजप ३ तर राष्ट्रीय समाज पक्षाने एक जागा जिंकली आहे.
निवडणुकीत विजय प्राप्त केलेल्यांमध्ये काँग्रेसचे वैभव भिवापुरे, जयश्री वायललवार, स्नेहा सातपुते, सुमेध तुरे, लोमेश बुरांडे, नितीन वायललवार, वर्षा भिवापुरे, अमोल आईचंवार हे विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे निशांत नैताम, काजल नैताम, माधुरी व्याहाडकर, वंदना गेडाम, राहुल नैताम यांनी विजय प्राप्त केला. तर, भाजपचे सोनाली पिपरे, रोशनी वरघंटे, गीता सोरते, राष्ट्रीय समाज पक्षाचे अमोल गण्यारपवार यांनी विजय प्राप्त केला.
अहेरीत भाजपला सर्वाधिक जागा
अहेरी नगरपंचायतीत भाजपचे सर्वाधिक ६ उमेदवार निवडून आले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर आविसं ५ जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसने ३ जागांवर विजय मिळविला. शिवसेनेने २ तर एक जागा अपक्षाने खेचून आणली. आता नगराध्यक्षपदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी निघते त्यावर पुढचे खेळ अवलंबून राहील.
या निकालने नगरपंचायतमध्ये मोठी रंजक स्थिती निर्माण झाली आहे. हा निकाल राजनगरीच्या राजकारणाला वेगळे रूप देणारा आहे. नगरपंचायतीत सत्तेची चाबी मिळवण्यासाठी करण्यात येणारी गोळाबेरीज अविश्वसनीय राहणार आहे. अहेरी नगरातील नागरिकांनी चार माजी नगरसेवकांना पुन्हा सेवेची संधी दिली. मात्र माजी नगराध्यक्ष, माजी उपसरपंच, नगरपंचायतीचे माजी पदाधिकारी तसेच पक्षाचे जिल्हा व तालुकास्तरावरील विविध पदाधिकाऱ्यांना पराभव पत्करावा लागला.