सिरोंचात आविसंची एकहाती सत्ता स्थापन होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2022 12:43 PM2022-02-03T12:43:50+5:302022-02-03T12:50:17+5:30
सिरोंचा नगरपंचायतीत आदिवासी विद्यार्थी संघाने सर्वाधिक जागा पटकावत स्पष्ट बहुमतही मिळवल्याने त्यांची एकहाती सत्ता स्थापित होणे निश्चित आहे.
नागभूषणम चकिनारपुवार
सिरोंचा : नगरपंचायतीची निवडणुकीची मतमोजणी व निकाल जाहीर होऊन दोन आठवडे होत आहेत. दरम्यानच्या काळात नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षणही जाहीर झाले. आता केवळ नगराध्यक्षाच्या निवडीचा कार्यक्रम कधी जाहीर होतो, याची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे. सिरोंचा नगरपंचायतीत आदिवासी विद्यार्थी संघाने सर्वाधिक जागा पटकावत स्पष्ट बहुमतही मिळवल्याने त्यांची एकहाती सत्ता स्थापित होणे निश्चित आहे.
नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे पक्षांचे पदाधिकारी सध्या निवडून आलेल्या नगरसेवकांना सांभाळण्यात व्यस्त आहेत. सिरोंचा नगरपंचायतीवर आविसंचे १० नगरसेवक निवडून येऊन त्यांनी स्पष्ट बहुमताचा आकडा गाठला आहे. त्यामुळे अध्यक्षासह उपाध्यक्षपदही आविसंकडेच राहणार जे निश्चित आहे.
आविसंकडून नगराध्यक्षपदासाठी शेख फरजाना इफ्तेखार, तर उपाध्यक्षपदासाठी शेख बबलू पाशा यांची नावे चर्चेत आहेत. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे, तसाच प्रयोग सिरोंचा नगरपंचायतीमध्ये केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाच आणि शिवसेनेकडे दोन नगरसेवक आहेत. काँग्रेसकडे एकही नगरसेवक नसल्याने राज्यातील प्रयोग सिरोंचा नगरपंचायतीमध्ये करणे शक्य होणार नाही. त्यामुळे आदिवासी विद्यार्थी संघच सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे.
आविसंचे नगरसेवक परराज्यात सहलीवर
आविसंचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानया जनगाम व नगरसेवक शेख बबलू पाशा यांच्या मार्गदर्शनात नवनिर्वाचित १० नगरसेवक परराज्यात सहलीवर गेलेले आहेत. आविसंकडे सात नगरसेविका आणि तीन नगरसेवक असे एकूण १० नगरसेवक आहेत. सध्या त्यांचे लक्ष नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या तारखांकडे लागले आहे. दोन दिवसांत हा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.