गडचिरोलीत आदिवासी व बहुजन महिलांच्या वेदनांना फोडली वाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 01:33 PM2018-03-08T13:33:53+5:302018-03-08T13:33:53+5:30
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी तसेच बहुजन महिलांच्या विविध समस्या व त्यांच्या जीवनातील वास्तव मांडणारी कवीयित्री म्हणजे गडचिरोली येथील कुसूम अलाम होय.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी तसेच बहुजन महिलांच्या विविध समस्या व त्यांच्या जीवनातील वास्तव मांडणारी कवीयित्री म्हणजे गडचिरोली येथील कुसूम अलाम होय. काव्य संग्रहातून त्यांनी महिलांच्या विविध प्रकारच्या वेदना प्रतिबिंबीत केल्या. महिला साहित्यिकांमध्ये त्यांचे नाव विदर्भासह महाराराष्ट्रात आदराने घेतले जाते.
‘रान आसवांचे तळे’, ‘रानपाखरांची माय’ या दोन काव्यसंग्रहातून त्यांनी आदिवासी महिलांच्या जीवनाचे वास्तव मांडले. गेल्या ३० वर्षांपासून त्यांचे लेखनकार्य अविरत सुरू आहे. शिवाय विविध वर्तमानपत्रात त्यांचे वैचारिक, प्रासंगिक व समिक्षणात्मक लेख प्रकाशित झाले आहे. गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यातील कवयित्री म्हणून उदयास आलेल्या कुसूम अलाम यांच्या चार कविता मुंबई विद्यापीठाच्या मराठी एम.ए.च्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.ए. भाग-१ च्या अभ्यासक्रमात तसेच गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या बीएसडब्ल्यू भाग-१ च्या अभ्यासक्रमात त्यांच्या कविता समाविष्ट करण्यात आल्या आहेत. कवयित्री अलाम यांच्या साहित्यातून आदिवासी महिला बहूजन, शेतकरी व श्रमीक वर्गातील महिलांच्या समस्या अधोरेखित झाल्या आहेत.
कुसूम अलाम यांना साहित्यासह समाजकारणात आवड आहे. विविध सामाजिक समस्या सोडविण्यासाठी त्यांनी लेखन कार्यासह चर्चासत्र, व्याख्यान व इतर माध्यमातून योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागातर्फे सन २०१४ मध्ये तत्कालीन राज्यपाल के. शंकर नारायण यांच्या हस्ते पुणे येथे आदिवासी सेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय विदर्भ साहित्य संमेलन, आदिवासी साहित्य संमेलनात त्यांचा सन्मान करण्यात आला. २००८ मध्ये सांगली येथे झालेल्या ८१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. पुणे येथे आदिवासी संस्कृती व मातृसत्ताक पद्धतीवर त्यांनी २०१६ मध्ये व्याख्यान दिले आहे.
आदिवासी एकता परिषदेचे राष्ट्राय महासचिव अशोक चौधरी यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या यात्रेत १० राज्याच्या आदिवासीबहुल भागात महिला व बाल अत्याचार तसेच शोषणाविरूद्ध जनजागृतीचे कार्य अलाम यांनी केले. कुसूम अलाम यांनी २००७ मध्ये गडचिरोली जिल्हा परिषदेची निवडणूकही लढविली. यात त्या मौशीखांब-मुरमाडी या जि.प. क्षेत्रातून सदस्य म्हणून निवडून आल्या. २००७ ते २०१२ दरम्यान जि.प.च्या माध्यमातून विविध समस्यांना वाचा फोडली.