आदिवासीच इथल्या जंगलाचे मालक, नक्षल्यांचा बाऊ करुन अन्याय नको; 'शेकाप'च्या जयंत पाटील यांचा इशारा

By संजय तिपाले | Published: December 9, 2023 05:30 PM2023-12-09T17:30:50+5:302023-12-09T17:31:02+5:30

जिल्ह्यात आदिवासींवर प्रशासनाकडून अन्याय होत असल्याचा आरोप इलाका प्रमुख सैनू गोटा यांनी केला.

Adivasis are the owners of the forest here, don't do injustice to Naxals says Jayant Patil | आदिवासीच इथल्या जंगलाचे मालक, नक्षल्यांचा बाऊ करुन अन्याय नको; 'शेकाप'च्या जयंत पाटील यांचा इशारा

आदिवासीच इथल्या जंगलाचे मालक, नक्षल्यांचा बाऊ करुन अन्याय नको; 'शेकाप'च्या जयंत पाटील यांचा इशारा

गडचिरोली : आदिवासी बांधव हेच इथल्या जंगलाचे बाप अन् मालक आहेत, त्यामुळे त्यांच्यावर अन्याय नको. पेसा कायद्याची अंमलबजावणी करा, नक्षल्यांचा बाऊ करुन आदिवासींवर अन्याय करु नका. लाल बावटा अजून जिवंत आहे, असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई  जयंत पाटील यांनी दिला. येथे प्रागतिक आघाडीच्या झेंड्याखाली डाव्या तसेच आंबेडकरी विचारांचे विविध पक्ष एकत्रित आले असून ९ डिसेंबरला महामोर्चाचे आयोजन केले होते, पण पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे चंद्रपूर रोडवरील लॉन्समध्ये महासभा घेण्यात आली.

अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष बाळासाहेब खोब्रागडे, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रदेशाध्यक्ष हरिष उईके, तुकाराम मस्के, शेकापचे जिल्हा सरचिटणीस रामदास जराते, इलाका प्रमुख सैनू गोटा, रोहिदास राऊत, महेश कोपूलवार, राज बन्सोड, मिलिंद बांबोळे, अमोल मारकवार, ईलियास पठाण, प्रशांत मडावी, कुणाल कोवे, विनोद मडावी,  देवराव चवळे, शामसुंदर उराडे, जयश्री वेळदा यांची उपस्थिती होती. भाई जयंत पाटील म्हणाले, गडचिरोलीत आदिवासी, ओबीसी बांधवांचे अनेक प्रश्न आहेत. वेळोवेळी ते विधिमंडळात मांडून मार्गी लावले आहेत. पेसा व वनकायद्याने स्वतंत्र अधिकारी दिले आहेत. खाण उत्खनन करताना स्थानिक ग्रामसभांची परवानगी घेऊन पेसा कायद्याची अंमलबजावणी करावी, असे आवाहन त्यांनी केले. इथल्या नद्या, जंगलांवर प्रकल्पांवर आदिवासींचा अधिकार आहे, वनउपजावर रोजगार आदिवासींना रोजगार मिळतो, त्यामुळे हा रोजगार कोणी हिरावून घेऊ शकत नाही. मोर्चाला परवानगी मिळत नाही, पण खाणींना मिळते. प्रशासनाने हा अन्याय करु नये. जालन्यात आंदोलकांवर लाठीचार्ज केला, आता लाखो लोक रस्त्यावर उतरत आहेत . लाल बावट्याची चळवळ संघर्ष करणारी आहे, असेही त्यांनी सांगितले. अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरु आहे. यावर भाष्य करताना अंगणवाडी सेविकांमुळे मुलांच्या शिक्षणाचा पाया भक्कम आहे. त्यामुळे अंगणवाडीसेविकांना प्राथमिक शिक्षकांचा दर्जा मिळायला हवा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

जे आमच्यासाठी, आम्ही त्यांच्यासाठी
जिल्ह्यात आदिवासींवर प्रशासनाकडून अन्याय होत असल्याचा आरोप इलाका प्रमुख सैनू गोटा यांनी केला. आदिवासींनी अन्यायाविरुध्द बोलायचेच नाही का असा सवाल करुन नक्षलसमर्थक ठरवून अटक केली जात असल्याचा दावा त्यांनी केला. जे  आमच्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी... अशा पध्दतीने यापुढील भूमिका राहणार असून जंगल व आदिवासी वाचले पाहिजेत अशी भूमिका त्यांनी मांडली. 

 
 

Web Title: Adivasis are the owners of the forest here, don't do injustice to Naxals says Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.