१४ शिक्षकांचे झाले समायोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 11:24 PM2017-09-18T23:24:12+5:302017-09-18T23:24:32+5:30
सन २०१६-१७ च्या संच मान्यतेनुसार जिल्ह्यातील खासगी अनुदानित शाळांमधील एकूण १११ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सन २०१६-१७ च्या संच मान्यतेनुसार जिल्ह्यातील खासगी अनुदानित शाळांमधील एकूण १११ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन जिल्ह्यात रिक्त असलेल्या पदावर करण्यासाठी सोमवारी स्थानिक शिवाजी हायस्कूल तथा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात शिबिराचे आयोजन करण्यात आले. या समायोजन प्रक्रियेत रिक्त असलेल्या १४ जागांवर १४ शिक्षकांचे समायोजन करण्यात आले. उर्वरित रिक्त असलेल्या दोन जागांसाठी विषयानुसार शिक्षक उपलब्ध न झाल्याने या दोन जागा रिक्त राहिल्या आहेत.
जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकारी (माध्य.) नानाजी आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या समायोजन प्रक्रियेदरम्यान उपशिक्षणाधिकारी (माध्य) संजय भिलकर, साई कोंडावार, अमोल राजूरकर, प्रशांत तम्मेवार आदी उपस्थित होते.
यावेळी इयत्ता पाचवीवर अध्यापन करणाºया दोन, इयत्ता सहावी ते आठवीकरिता सात आणि इयत्ता नववी ते दहावीसाठी पाच अशा एकूण १४ शिक्षकांचे रिक्त जागांवर समायोजन करण्यात आले.
उर्वरित ९५ वर शिक्षकांच्या समायोजनासाठीची प्रक्रिया विभागस्तरावर करण्यात आली आहे. गडचिरोलीच्या माध्यमिक शिक्षण विभागाने नागपूर विभागात सर्वप्रथम समायोजनाची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. समायोजन प्रक्रिया लवकर झाल्याने अतिरिक्त ठरलेल्या संबंधित शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार जि. प. च्या माध्यमिक शिक्षण विभागाने ही समायोजनाची प्रक्रिया राबविली.
समायोजन झालेले शिक्षक
२०१६-१७ च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या १४ शिक्षकांचे जिल्ह्यातील खासगी शाळांमधील रिक्त जागांवर माध्यमिक शिक्षण विभागातर्फे समायोजन करण्यात आले. यामध्ये अरूण चौधरी, गंगा भोंगडे, हेमराज म्हस्के, वंदना जाधव, अर्चना धुर्के, बालीकदास जगझापे, इंदिरा वाळके, शारदा पारधी, हरेश बावनकर, अशोक गजभिये, रेवान बोरकुटे, सुधाकर दोनाडकर, कैैलास बोरकर, भीमराव मेश्राम आदी शिक्षकांचा समावेश आहे.