३६ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन
By admin | Published: November 8, 2014 01:16 AM2014-11-08T01:16:57+5:302014-11-08T01:16:57+5:30
२०११ मध्ये राज्यभरासह जिल्ह्यात करण्यात आलेल्या पटपडताळणी मोहिमेदरम्यान कमी विद्यार्थी संख्या...
गडचिरोली : २०११ मध्ये राज्यभरासह जिल्ह्यात करण्यात आलेल्या पटपडताळणी मोहिमेदरम्यान कमी विद्यार्थी संख्या आढळून आलेल्या शाळातील अनेक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी अतिरिक्त ठरले. या अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची कार्यवाही गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे. प्राथमिक तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी ५ आॅक्टोबर रोजी एकाच दिवशी ५० अतिरिक्त शिक्षकांपैकी ३६ शिक्षकांचे खासगी अनुदानित शाळेत आॅनलाईन समुपदेशनाने समायोजन केले आहे.
जिल्ह्यात खासगी अनुदानित शाळांचे एचएससी डीएड्धारक ३० शिक्षक अतिरिक्त ठरले होते. यापैकी १७ शिक्षकांचे समायोजन ५ व्या वर्गाला शिकविण्यासाठी दुसऱ्या खासगी अनुदानित शाळांमध्ये करण्यात आले आहे. १३ पैकी १३ ही अतिरिक्त शिक्षकांचे इयत्ता ७ वी ते ८ व्या वर्गावर समायोजन करण्यात आले आहे. ७ अतिरिक्त शिक्षकांपैकी ६ शिक्षकांचे समायोजन इयत्ता ९ वी ते १० वी वर्गावर जिल्ह्यातील खासगी अनुदानित शाळेत आॅनलाईन समुपदेशनाने करण्यात आले आहे. तसेच काही शिक्षकांचे समायोजन कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात करण्यात आले आहे.
यापूर्वी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागातर्फे ३३ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन संस्थास्तरावर करण्यात आले असल्याची माहिती आहे. आता एसएससी डीएड्धारक १४ शिक्षकांचे समायोजन शिल्लक आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे इयत्ता ६ वी ते ८ वी व इयत्ता ९ वी ते १० वी वर्गावर अनेक अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत. मात्र शिल्लक असलेले १४ शिक्षकांकडे या वर्गांना अध्यापन करण्यासाठी पात्रता नसल्यामुळे या शिक्षकांचे समायोजन झाले नाही. उर्वरित १४ शिक्षकांचे समायोजन डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
संपूर्ण राज्यात गडचिरोली जिल्हा परिषदेचा प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेत प्रथम क्रमांकावर असल्याचे समजते. गडचिरोलीशिवाय अनेक जिल्ह्यात अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन शिल्लक आहे. अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समायोजन व वेतन अदा करण्याबाबत १४ आॅक्टोबर २०१४ रोजी शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार अतिरिक्त शिक्षकांना सामावून न घेणाऱ्या शाळांवर कारवाई केली जाणार आहे, असे निर्देश राज्याच्या शालेय शिक्षण सचिव अश्विनी भिडे यांनी दिले होते. त्यानंतर शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी जिल्ह्यात अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला गती दिली. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात उपलब्ध जागेनुसार समायोजनाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.(स्थानिक प्रतिनिधी)