जिल्हाभरातील ४७६ विषय शिक्षकांचे समायोजन
By Admin | Published: March 21, 2017 12:46 AM2017-03-21T00:46:08+5:302017-03-21T00:46:08+5:30
रिक्त असलेल्या जागांवर विषय शिक्षकांची नेमणूक करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने शहरातील जिल्हा परिषद सभागृहात ...
दोन हजार शिक्षकांना बोलाविले : विकल्प भरण्यासाठी जिल्हा परिषदेत उसळली मोठी गर्दी
गडचिरोली : रिक्त असलेल्या जागांवर विषय शिक्षकांची नेमणूक करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने शहरातील जिल्हा परिषद सभागृहात रविवारी व सोमवारी समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात आली होती. या प्रक्रियेदरम्यान ४७६ शिक्षकांचे समायोजन करण्यात आले आहे.
सप्टेंबर महिन्यात करण्यात आलेल्या संचमान्यतेनुसार रिक्त असलेल्या जागांवर शिक्षकांची नेमणूक करायची होती. सर्वप्रथम मुख्याध्यापकांचे समायोजन शुक्रवारी करण्यात आले. त्यानंतर विषय शिक्षक व पदवीधर शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया रविवारपासून राबविण्यास सुरूवात झाली. समायोजनासाठी जवळपास दोन हजार शिक्षकांना बोलविण्यात आले होते. विषय शिक्षकांमध्ये विज्ञान व गणित शिक्षकाच्या ३७९ जागा, भाषा विषयाच्या ८१ जागा, सामाजिकशास्त्र विषयाच्या १६ जागा रिक्त होत्या. रविवारी भाषा, सामाजिकशास्त्र विषयाच्या जागा भरण्यात आल्या. विज्ञान व गणित विषयाच्या जागा सोमवारी समायोजनाच्या माध्यमातून भरण्यात आल्या आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्राथमिक शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया राबविली जाणार आहे. याच दरम्यान पदवीधर शिक्षकांच्या ६३ जागा सुध्दा भरण्यात आल्या आहेत. पदवीधर शिक्षकांच्या यादीमध्ये घोळ झाला असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला होता. मात्र जुन्या यादीप्रमाणेच शिक्षकांचे समायोजन करण्याची प्रक्रिया पुढे राबविण्यात आली. विकल्प भरण्यासाठी सोमवारी जिल्हा परिषदेत शिक्षकांची गर्दी होती. कुरखेडा तालुक्यातील उराडी येथील व एटापल्ली तालुक्यातील एका शाळेच्या मुख्याध्यापकाने संचमान्यताच केली नसल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे दोन्ही मुख्याध्यापकांवर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारवाई करीत दोन्ही मुख्याध्यापकांकडील पद काढून त्यांना विषय शिक्षक म्हणून नेमण्यात आले. (प्रतिनिधी)