शासनच झोपेत असल्याने प्रशासनही झोपले- धर्मरावबाबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:05 AM2017-11-15T00:05:11+5:302017-11-15T00:05:32+5:30
जिल्ह्यात आज कोणती विकास कामे सुरू आहेत किंवा नाहीत याच्याशी जिल्ह्याच्या सत्ताधारी नेत्यांना काहीही देणेघेणे नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात आज कोणती विकास कामे सुरू आहेत किंवा नाहीत याच्याशी जिल्ह्याच्या सत्ताधारी नेत्यांना काहीही देणेघेणे नाही. शासनच झोपेत आहे, त्यामुळे प्रशासनही झोपले आहे. आमच्या कार्यकाळात मंजूर झालेली कामेही या सरकारच्या कार्यकाळात पूर्ण होऊ शकलेली नाहीत, अशी खंत माजी मंत्री आणि राष्टÑवादी काँग्रेसचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी मंगळवारी येथे पत्रपरिषदेत व्यक्त केली.
गेल्या सरकारच्या कार्यकाळात आर.आर. पाटील या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जिल्ह्यात अनेक कामे मंजूर होऊन झपाट्याने मार्गी लागली. ज्या प्रमाणात त्यावेळी जिल्ह्याला निधी मिळत होता तेवढा निधी गेल्या तीन वर्षात कधीही मिळाला नाही. नागरिकांनीच आता तो काळ आणि आताचा काळ याची तुलना करावी, असे आवाहन धर्मरावबाबांनी केले.
सुरजागड पहाडीवर मोठ्या प्रमाणात असलेल्या लोहखनिज उत्खननातून आदिवासी नागरिकांचे उत्थान व्हावे यासाठी मी खनिकर्म खात्याचा मंत्री असताना या प्रकल्पाचा मंजुरी दिली होती. त्यामुळे या प्रकल्पाला माझा विरोध नाही. पण त्यातून आदिवासींना रोजगार निर्मिती करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. आदिवासी लोकांनी केवळ दगड फोडण्याचेच काम करावे का? त्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण द्यावे, पोकलँडने उत्खनन करण्याऐवजी आदिवासी लोकांना रोजगार मिळेल यासाठी प्रयत्न व्हावेत. आदिवासींना ट्रक खरेदीसाठी कर्ज देऊन लोहखजिन उत्खननासाठी त्या ट्रक्सचा वापर करून त्याच्या मोबदल्यातून कर्ज फेडण्याची सोय करावी असा सल्लाही यावेळी धर्मरावबाबांनी दिला. पण हे सर्व करण्याची तळमळ ना प्रशासनात आहे, ना सरकारमध्ये. त्यामुळे पुढील निवडणुकीत नागरिकांनी योग्य तो निर्णय घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. पत्रपरिषदेला जि.प.सभापती भाग्यश्री आत्रामही उपस्थित होत्या.
पवारांच्या विदर्भ दौºयाची सुरूवात गडचिरोलीतून
राष्टÑवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या विदर्भात ठिकठिकाणी जाहीर सभा होणार आहेत. या दौºयाची सुरूवात गडचिरोलीपासून होत आहे. अनेक वर्षानंतर ते गडचिरोली जिल्ह्यात येणार असल्यामुळे राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनाच नाही तर नागरिकांनाही त्यांच्या आगमनाची उत्सुकता असल्याचे यावेळी आत्राम यांनी सांगितले. पवार यांची जाहीर सभा बुधवार दि.१५ ला दुपारी १ वाजता अभिनव लॉन येथे होणार आहे.