आरमोरीत नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यास प्रशासन उदासीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:41 AM2021-08-13T04:41:28+5:302021-08-13T04:41:28+5:30
आरमोरी येथे ग्रामपंचायत अस्तित्वात असताना बर्डी भागात वैनगंगा नदीवरून वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली होती. १३-१४ वर्षांच्या कालावधीत ...
आरमोरी येथे ग्रामपंचायत अस्तित्वात असताना बर्डी भागात वैनगंगा नदीवरून वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली होती. १३-१४ वर्षांच्या कालावधीत शहराचा विस्तार व लोकसंख्याही झपाट्याने वाढली. मात्र, वाढत्या लोकसंख्येनुसार पाण्याची मागणीही वाढली. सध्या पाणीपुरवठा योजना जुनीच असल्याने शहरासाठी जुनी पाणीपुरवठा योजना तोकडी पडत आहे. आरमोरी येथे नगरपरिषद अस्तित्वात येऊन तीन वर्षांचा कालावधी उलटला; मात्र प्रशासनाने उपाययाेजना केली नाही. पाणीपुरवठा समस्येवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आरमोरी विधानसभा अध्यक्ष शरद सोनकुसरे, अमोल उके, सुभाष धकाते, साबीर शेख, कुलदीप सोनकुसरे, विधानसभा संघटन-सचिव मिलिंद सपाटे, आदी कार्यकर्त्यांनी नगराध्यक्ष पवन नारनवरे, बांधकाम सभापती सागर मने व पाणीपुरवठा अभियंता नितीन गौरखेडे यांची नगरपरिषद कार्यालयात भेट घेऊन चर्चा केली. तरीसुद्धा काहीच उपयाेग झाला नाही.
बाॅक्स
शासन सकारात्मक तरीही कानाडाेळा
आरमाेरी शहरातील संभाव्य लोकसंख्या विचारात घेऊन रवी गावाजवळील वैनगंगा नदीवरून १.२७ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षणास मंजुरी प्रदान केली. परंतु, नगरपरिषद आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने पिण्याच्या पाण्याचे आरक्षणपोटी सिंचन पुनर्स्थापना खर्च घेण्यात येऊ नये, असेही कळविले. शासन सकारात्मक विचार करीत असताना संबंधित कामाकरिता जागा उपलब्ध नसणे, प्रकल्प अहवालात त्रुटी असणे, अंदाजपत्रक तयार करताना पुरेशी काळजी न घेणे याचा परिणाम पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास न येण्याकडे होत आहे. आजची अंदाजे ३० कोटींची पाणीपुरवठा योजना अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे किती कोटींवर जाईल हे येणारा काळच ठरवेल. ही पाणीपुरवठा योजना तातडीने मंजूर होण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे आपण पाठपुरावा करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
110821\1032img-20210809-wa0066.jpg
आरमोरी चे नगराध्यक्ष पवन नारनवरे यांच्याशी चर्चा करताना राष्ट्रवादीचे आरमोरी विधानसभा अध्यक्ष शरद सोनकुसरे