आश्रमशाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूला प्रशासन जबाबदार
By admin | Published: October 7, 2016 01:34 AM2016-10-07T01:34:56+5:302016-10-07T01:34:56+5:30
धानोरा तालुक्यातील येरमागड शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी राजमू बुधकर धुर्वे या विद्यार्थ्याचा २६ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला
पालकांचा आरोप : येरमागड येथील विद्यार्थी मृत्यूप्रकरण
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील येरमागड शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी राजमू बुधकर धुर्वे या विद्यार्थ्याचा २६ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस आदिवासी विकास विभागाचे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप आश्रमशाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी गुरूवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यापासून आश्रमशाळेतील संपूर्ण २१३ विद्यार्थी शाळा सोडून गेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्याचे नुकसान होत आहे, अशीही माहिती दिली.
केंद्र शासनाकडून आदिवासी विकास विभागाला कोट्यवधी रूपयांचा निधी उपलब्ध होतो. तरीही आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना भौतिक व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाही. गडचिरोली येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे दोन ते तीन कार्यालयाचा पदभार दिला आहे. त्यामुळे ते आदिवासी विकास विभागाकडे पूर्णपणे लक्ष देऊ शकत नाही. प्रशासकीय जबाबदारी पार पाडताना अडचणी निर्माण होतात. पर्यवेक्षिय यंत्रणासुद्धा व्यवस्थित काम करीत नाही. राजमू धुर्वे या विद्यार्थ्याच्या मृत्यूस सहायक प्रकल्प अधिकारी व निरीक्षक जबाबदार आहेत. शाळा तपासणीच्या वेळी आश्रमशाळेत असलेल्या कमरता ते अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देत नाही. त्यामुळे निरीक्षक व सहायक प्रकल्प अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. आश्रमशाळेमध्ये आवश्यक सोयीसुविधा पुरविण्यासाठी राज्यपाल यांना निवेदन पाठविले जाणार आहे, अशी माहिती शाळा समिती अध्यक्ष सुधाकर तुलावी, संदीप वरखडे यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेला सुनील कुमरे, भगवान मडावी, लिंगा वेलादी, सुखदेव नैताम, रामदास कुळमेथे उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)