शहरी भागातील प्रत्येक कुटुंबावर प्रशासनाची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 05:00 AM2020-09-10T05:00:00+5:302020-09-10T05:00:53+5:30
जिल्ह्यात कोरोना भरीवर असताना सीईओ म्हणून आशीर्वाद रुजू झाले. कोरोनाची स्थिती जिल्ह्यात सध्या आहे त्यापेक्षाही वाढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. वास्तविक कोरोना हा आजार मुळात गंभीर नाही. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून प्राथमिक स्थितीतच त्यावर उपचार करणे टाळल्यास आजाराची गुंतागुंत वाढून उपचार करण्यापलिकडे जातो. त्यामुळे ही स्थिती येण्याआधीच थोडी जरी लक्षणे दिसली तरी लोकांनी कोरोना चाचणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरोनाचा प्रसार शहरातूनच खेड्याकडे होत आहे. त्यामुळे शहरातच कोरोनाला नियंत्रित ठेवल्यास ग्रामीण भागात उदे्रक होणार नाही. त्यामुळे गडचिरोली शहरासह जिल्ह्यातील सर्व शहरी भागात प्रत्येक कुटुंबाच्या आरोग्यविषयक स्थितीवर नजर ठेवण्याची स्वतंत्र व्यवस्था प्रशासनाकडून केली जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
जिल्ह्यात कोरोना भरीवर असताना सीईओ म्हणून आशीर्वाद रुजू झाले. कोरोनाची स्थिती जिल्ह्यात सध्या आहे त्यापेक्षाही वाढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. वास्तविक कोरोना हा आजार मुळात गंभीर नाही. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून प्राथमिक स्थितीतच त्यावर उपचार करणे टाळल्यास आजाराची गुंतागुंत वाढून उपचार करण्यापलिकडे जातो. त्यामुळे ही स्थिती येण्याआधीच थोडी जरी लक्षणे दिसली तरी लोकांनी कोरोना चाचणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
सध्या आरोग्य विभागाकडून ग्रामीण भागात आजाराबाबत सर्व्हेक्षण सुरू असले तरी शहरी भागासाठी तेवढे मनुष्यबळ उपलब्ध नाही. त्यामुळे ९ ते ११ वीच्या एक हजार विद्यार्थ्यांची यासाठी मदत घेतली जाईल. ७० हजारच्या घरात लोकसंख्या (२० हजार कुटुंब) असलेल्या गडचिरोली शहरासाठी निवडलेले विद्यार्थी मोबाईलने, व्हॉटस अॅप ग्रुपच्या माध्यमातून आपल्या परिसरातील २० कुटुंबांच्या संपर्कात राहतील. त्या विद्यार्थ्यांकडील माहिती एमएसडब्ल्यूचे विद्यार्थी आरोग्य विभागाला पुरवेल. यातून कुटुंबांच्या आरोग्यावर लक्ष ठेवले जाईल.
तीन ठिकाणी नवीन सुसज्ज कोविड केंद्र
जिल्ह्यात आतापर्यंत केवळ जिल्हा सामान्य रुग्णालयात असलेले कोविड आरोग्य केंद्र आता सिरोंचा (५० बेड), अहेरी (१०० बेड) आणि एटापल्ली (५० बेड) येथेही सुरू केले जाणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प््यात आहे. त्या ठिकाणी प्रत्येक बेडवर आॅक्सिजनची सुविधा राहणार असून चांगल्या उपचारासाठी डॉक्टरांचे प्रशिक्षणही सुरू आहे.
३-३ महिन्यासाठी ऐच्छिक सेवा घेणार
जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. कारण कमी पगारात जिल्ह्याच्या ग्रामीण आणि दुर्गम भागात सेवा देण्यासाठी जाण्यास कोणी डॉक्टर तयार नसतात. पण सेवाभावी दृष्टिने जे कोणी जाण्यास तयार होतील त्यांना प्रोत्साहन देऊन ३-३ महिन्यासाठी त्यांची सेवा घेतली जाईल. त्यांना हार्डशिप अलाऊन्सही दिला जाईल, असे सीईओ आशीर्वाद यांनी सांगितले.
म्हणून प्रशासक म्हणून केवळ अधिकारी ठेवले
कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून योग्य व्यक्ती निवडावी असे आदेशात म्हटले आहे. पण त्यात शासकीय अधिकारी सोडून दुसऱ्यांची नियुक्ती केली तर त्या नियुक्तीमागे राजकीय प्रभाव असल्याचे मानले जाते. हे टाळण्यासाठी विस्तार अधिकाऱ्यांची कमतरता असतानाही तालुक्याच्या कृषी अधिकाºयांकडे प्रशासक म्हणून जबाबदारी दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.