जिल्ह्यात कोरोनाच्या लसीकरणासाठी प्रशासकीय तयारीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 05:00 AM2020-12-09T05:00:00+5:302020-12-09T05:00:25+5:30

जिल्हाधिकारी सिंगला यांनी आरोग्य विभागाला माहिती गोळा करण्याचे आदेश दिले. सदर बैठकीत लसीकरणाच्या अनुषंगाने आवश्यक नियोजन करण्यात आले. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, अतिरिक्त पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.अनिल रुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर तसेच संबंधित विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

Administrative preparations for corona vaccination begin in the district | जिल्ह्यात कोरोनाच्या लसीकरणासाठी प्रशासकीय तयारीला सुरुवात

जिल्ह्यात कोरोनाच्या लसीकरणासाठी प्रशासकीय तयारीला सुरुवात

Next
ठळक मुद्देजिल्हा व तालुका कृती दलाची स्थापना, आरोग्य कर्मचाऱ्यांची २९७ पथके निर्माण करणार

  लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोविड-१९ महामारीच्या प्रतिबंधासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार लस उपलब्ध झाल्यानंतर लसीकरणाची मोहिम पुढील महिन्यात सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात जिल्हा व तालुकास्तरावर कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, नंतर फ्रंटलाईन वर्कर्स, त्यानंतर ५० वर्षापेक्षा जास्त वयाचे आणि ५० वर्षाच्या आतील आजारी व्यक्तींना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात लस टोचली जाणार आहे. या अनुषंगाने मंगळवारी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक पार पडली. 
यावेळी जिल्हाधिकारी सिंगला यांनी आरोग्य विभागाला माहिती गोळा करण्याचे आदेश दिले. सदर बैठकीत लसीकरणाच्या अनुषंगाने आवश्यक नियोजन करण्यात आले. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, अतिरिक्त पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.अनिल रुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर तसेच संबंधित विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची २९७ पथके निर्माण करून लसीकरण प्रक्रिया राबविली जाणार आहे. एक पथकात पाच कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. यामध्ये सहभागी सर्व सदस्यांना लसीकरण प्रक्रियेबाबत प्रशिक्षण दिले जाणार असून त्यांच्यामार्फत लसीकरणाची मोहिम यशस्वी केली जाणार आहे.
लसीकरण मोहीम राबवित असताना ती थंड तापमानात ठेवावी लागते. त्याअनुषंगाने जिल्हा व तालुकास्तरावर लसीची साठवणूक आणि वाहतुकीबाबत नियोजन करण्यात आले आहे. तसेच प्रत्यक्ष लसीकरण करण्याच्या ठिकाणांबाबत संबंधीतांना सूचना देण्यात आल्या आहेत.

कृती दलात विविध विभागांचा समावेश
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागाच्या विभाग प्रमुखांचा या टास्क फोर्समध्ये समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, प्रकल्प अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण), सहायक आयुक्त समाज कल्याण, शिक्षणाधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, तसेच इतर काही अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
लसीकरणाबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका- जिल्हाधिकारी
कोरोना संसर्गाबाबत जगभर विविध लसींबाबत सामाजिक माध्यमांवर  माहिती प्रसारीत होत आहे. या अनुषंगाने उलटसुलट चर्चावर नागरिकांनी विश्वासु ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांनी यावेळी केले. चुकीच्या माहितीबाबत व झालेल्या गैरसमजांबाबत आरोग्य विभागाकडून खात्री करावी. खात्री झालेली माहितीच इतरांना पाठवावी किंवा सांगावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

३५ नवीन बाधित
गडचिरोली : जिल्ह्यात मंगळवारी ३५ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तसेच गोकुळनगर गडचिरोली येथील ७१ वर्षीय वृद्ध पुरुषाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान ५० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत बाधित ८३२१ पैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ७८३१ वर पोहोचली आहे. सध्या ४०१ क्रियाशिल कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकुण ८९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे.  नवीन ३५ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १३, अहेरी ५, आरमोरी २, भामरागड ५, चामोर्शी १, धानोरा ५ आणि एटापल्ली तालुक्यातील १ जणाचा समावेश आहे.

Web Title: Administrative preparations for corona vaccination begin in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.