गडचिरोलीतील मार्कंडेश्वरालाही घ्या दत्तक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 11:31 AM2018-05-12T11:31:00+5:302018-05-12T11:31:10+5:30

‘अ‍ॅडॉप्ट ए हेरिटेज’ ही योजना केंद्र शासनाने सुरू केली आहे. या योजनेंतर्गत एखाद्या कंपनीने चामोर्शी तालुक्यातील मार्कंडेश्वर देवस्थानालाही दत्तक घेऊन विकास करावा, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.

Adopt Markandeshwar temple in Gadchiroli! | गडचिरोलीतील मार्कंडेश्वरालाही घ्या दत्तक !

गडचिरोलीतील मार्कंडेश्वरालाही घ्या दत्तक !

googlenewsNext
ठळक मुद्देभाविकांची अपेक्षालाल किल्ल्याप्रमाणे विकास करण्याची मागणी

रत्नाकर बोमीडवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : देशातील ऐतिहासिक स्थळांची देखभाल, दुरूस्ती करून त्या स्थळांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांना ही स्थळे दत्तक घेण्यासाठी ‘अ‍ॅडॉप्ट ए हेरिटेज’ ही योजना केंद्र शासनाने सुरू केली आहे. या योजनेंतर्गत एखाद्या कंपनीने चामोर्शी तालुक्यातील मार्कंडेश्वर देवस्थानालाही दत्तक घेऊन विकास करावा, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.
सेंट्रल ट्रायव्हिसेसच्या रिपोर्टनुसार १८७४-७५ मध्ये ब्रिटीश इतिहासकार फर्निंगहॅम यांनी मार्कंडेश्वराला भेट दिल्याचा दाखला मिळतो. त्यावेळी येथे एकूण २४ मंदिरे होती. १९६ फूट लांब व १६८ फूट रूंद अशा चौरस भागात ही मंदिरे होती, असा उल्लेख फर्निंगहॅम यांनी केला आहे. पुरातत्व विभागाच्या १८९७ च्या अहवालानुसार १२० वर्षांपूर्वी (म्हणजे १७७७ मध्ये) मंदिरावर वीज पडून हानी झाली. त्यानंतर तत्कालीन गोंडराजाने डागडुजी केली, असेही नमूद आहे. मात्र तो भाग पूर्वीप्रमाणे होऊ शकला नाही आणि पुन्हा तो भाग कित्येक वर्षांपासून खचलेल्या अवस्थेत आहे.
१९२४-२५ च्या सुमारास भारतीय पुरातत्व विभागाने सर्वप्रथम या स्थळाची नोंद घेतली. यावरून सदर वास्तू अतिशय जुनी असल्याचे दिसून येते. मार्कंडा येथील मुख्य मंदिरासह इतर मंदिरांवर खजुराहो येथील मंदिरांप्रमाणे नक्षीकाम करण्यात आले आहे.
सद्य:स्थितीत मंदिराचा विकास पुरातत्व विभाग करीत आहे. जीर्णोध्दार करण्यासाठी मंदिराचा कळस दोन वर्षांपूर्वी उघडून ठेवला आहे. हे काम ‘जैसे थे’ अवस्थेत आहे. देवस्थानाचे पुरातन महत्त्व लक्षात घेऊन जिर्णोद्धार करण्यासाठी ‘अ‍ॅडॉप्ट ए हेरिटेज’ या केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत एखादी व्यक्ती किंवा संस्थेला द्यावे, अशी मागणी होत आहे. लाल किल्ल््याप्रमाणे देशातील ९० वास्तू दत्तक दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये राज्यातील औरंगाबाद येथील बिबी का मकबरा, लेण्यांद्रीच्या लेण्या यांचा समावेश आहे.
शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले वैनगंगा नदीच्या तिरावरील मार्कंडेश्वराचे मंदिर दत्तक योजनेत समाविष्ट केल्यास या स्थळाचा विकास होऊन जिल्ह्यात धार्मिक पर्यटकांचा ओघ वाढू शकेल.

Web Title: Adopt Markandeshwar temple in Gadchiroli!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Templeमंदिर