आरमोरीत आॅनलाईन मटका जोरात
By admin | Published: March 29, 2017 02:11 AM2017-03-29T02:11:16+5:302017-03-29T02:11:16+5:30
आरमोरी शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील काही गावांमध्ये सध्या आॅनलाईन मटका जोरात सुरू झाला आहे.
विद्यार्थी तरूण पैसे लावण्यात गुंतले
जोगीसाखरा : आरमोरी शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील काही गावांमध्ये सध्या आॅनलाईन मटका जोरात सुरू झाला आहे. आरमोरी पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
आरमोरी तालुक्यामध्ये आरमोरी शहरासह ग्रामीण भागात सट्ट्या प्रमाणेच आॅनलाईन मटका बाजार मोठ्या प्रमाणावर तेजीत आहे. विविध चौकांमध्ये आॅनलाईन मटका व्यवसाय थाटल्या गेला असून तरूण व युवक वर्ग तसेच शालेय विद्यार्थी कमी पैशात जास्त पैसे मिळतील म्हणून दिवसभर येथे मटका खेळत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात आॅनलाईन मटका दुकानांची संख्या वाढल्याने नागरिकांचा मोठा पैसा यात दररोज जात असल्याचे दिसून येत आहे.
शहरी व ग्रामीण भागात या आॅनलाईन लॉटरीमध्ये कोट्यवधी रूपयांची उलाढाल होत आहे. अनेकदा याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या. परंतु पोलीस पोहोचण्याच्या आतच बाजाराचा दरवाजा बंद करून अवैध व्यावसायिक पसार होतो. असे दिसून येते. या मागे हप्ते वसुली हे सगळ्यात मोठे कारण आहे. पोलिसांची कारवाईच गोपनिय राहत नाही. त्यामुळे आरमोरी शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आॅनलाईन मटका सुरू झाला आहे. हा तत्काळ बंद करण्यात यावा, अशी मागणी या भागातील महिला व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.