बाधित ७४ शेतकरी अर्थसहाय्यापासून वंचित
By admin | Published: June 15, 2017 01:36 AM2017-06-15T01:36:55+5:302017-06-15T01:36:55+5:30
तालुक्यातील कुंभीटोला, कुरखेडा या दोन गावांची खरीप हंगाम २०१५ च्या पिकांची ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी होती.
२०१५ च्या हंगामात ५० पैसेपेक्षा कमी आणेवारी
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : तालुक्यातील कुंभीटोला, कुरखेडा या दोन गावांची खरीप हंगाम २०१५ च्या पिकांची ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी होती. त्यामुळे या दोन गावांना दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले होते. मात्र बाधित ७४ शेतकऱ्यांना अद्यापही शासनाकडून अर्थसहाय्य मिळाले नाही. त्यामुळे अर्थसहाय्य घेण्याची कार्यवाही तत्काळ करावी, अशी मागणी या दोन गावातील ७४ शेतकऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यासंदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. निवेदनात म्हटले आहे की, १५ जानेवारी २०१६ च्या पत्रानुसार कुरखेडाच्या तहसीलदारांकडे बाधित शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. मात्र शासनाचे निर्देश बाजूला सारून प्रत्यक्ष बाधित शेतकऱ्यांना अर्थसहाय्य न देता शासनाच्या निधीचा गैरवापर झाला आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात शासनाने चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी कुरखेडा येथील शेतकरी नरेशचंद्र नाकाडे, भास्कर देशमुख, राजीराम देशमुख, वामदेव सोनकुसरे, विस्तारी भानारकर, बालकदास चांदेवार आदींनी केली आहे.