१२ वर्षानंतर हिरंगे ग्रामपंचायत मध्ये पदाधिकारी आरूढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 01:12 AM2018-06-08T01:12:51+5:302018-06-08T01:12:51+5:30
तालुक्यातील नक्षलग्रस्त हिरंगे येथे २००५ पासून ग्रामपंचायत सरपंच व सदस्य पदासाठी नामनिर्देशन होत नव्हते. त्यामुळे येथे निवडणूक प्रक्रियेला अडचण यायची. १२ वर्षांपासून येथे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. मे २०१८ मध्ये सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आल्याने येथे सरपंच व सदस्य आरूढ झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : तालुक्यातील नक्षलग्रस्त हिरंगे येथे २००५ पासून ग्रामपंचायत सरपंच व सदस्य पदासाठी नामनिर्देशन होत नव्हते. त्यामुळे येथे निवडणूक प्रक्रियेला अडचण यायची. १२ वर्षांपासून येथे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. मे २०१८ मध्ये सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आल्याने येथे सरपंच व सदस्य आरूढ झाले आहेत.
मे महिन्यात पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी तहसीलदार महेंद्र गणवीर यांनी गावातील लोकांना मार्गदर्शन व जागृती करून कोणत्याही दबावाखाली न येता निर्भयपणे नामनिर्देशनपत्र भरण्याचे आवाहन केले होते. सोबतच जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी पुढाकार घेतला. गावातील नागरिकांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन उत्स्फूर्तपणे नामनिर्देशन पत्र भरले. एकूण सात सदस्यांपैकी चार सदस्य व एकाने सरपंचपदासाठी नामनिर्देशन पत्र भरला होता. सरपंच म्हणून कवलसिंग देवलसिंग राणा, सदस्य म्हणून खडूहा तरनसाय तुळशिराम, फरदीया उर्मिला भुकूराम, ताराम जयराम भुकूराम व फरदीया ललतुराम नारायण हे अविरोध निवडून आले. १२ वर्षानंतर हिरंगे ग्रामपंचायत गठित झाली असून प्रशासनाला यश मिळाले आहे, असे मत तहसीलदार महेंद्र गणवीर यांनी व्यक्त केले.
सरपंच व सदस्यांना प्रमाणपत्राचे वितरण तहसीलदारांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार डी.एस. नैताम, डी.आर. भगत, बी.एम. वाकुकुडकर, नगरसेवक समीर कुरेशी, अर्चना दुधबावरे उपस्थित होते.