१४ वर्षांनंतर नक्षल सप्ताहात कोरचीची बाजारपेठ सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 12:25 AM2018-07-29T00:25:51+5:302018-07-29T00:27:40+5:30
कोरची येथील औषध विक्रेते डॉ. प्यारेलाल अग्रवाल यांची नक्षल्यांनी २००४ रोजी कोरची येथील भर चौकात दुपारी हत्या केली होती. तेव्हापासून कोरचीवासीयांमध्ये नक्षल्यांच्या शहीद सप्ताहाविषयी दहशत निर्माण झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : कोरची येथील औषध विक्रेते डॉ. प्यारेलाल अग्रवाल यांची नक्षल्यांनी २००४ रोजी कोरची येथील भर चौकात दुपारी हत्या केली होती. तेव्हापासून कोरचीवासीयांमध्ये नक्षल्यांच्या शहीद सप्ताहाविषयी दहशत निर्माण झाली होती. नक्षल बंद दरम्यान कोरची येथील बाजारपेठ हमखास बंद ठेवली जात होती. मात्र यावर्षी नक्षल सप्ताहाच्या पहिल्या दिवशीच कोरचीतील बाजारपेठ उघडण्यात आली. यावरून नक्षल्यांची दहशत कमी झाल्याचे दिसून येत आहे.
नक्षल्यांतर्फे दरवर्षी २८ जुलै ते ३ आॅगस्ट या कालावधीत शहीद सप्ताह पाळला जातो. या सप्ताहा दरम्यान बाजारपेठ व वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्याचे आवाहन केले जाते. या कालावधीत नक्षल्यांकडून हिंसाचाराच्या घटना घडवून आणल्या जात असल्याने दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील नागरिक या कालावधीत बंद पाळत होते. एवढेच नव्हे तर नक्षल सप्ताहाच्या पहिल्या दिवशी धान रोवणीचे कामही बंद ठेवले जात होते. तालुका स्थळांवर नक्षलबंदचा फारसा प्रभाव दिसून येत नव्हता मात्र कोरची याला अपवाद ठरले होते. नक्षल सप्ताहादरम्यान २००४ पासून या ठिकाणी बंद पाळला जात होता. मात्र यावर्षी कोरचीचे प्रभारी पोलीस अधिकारी गोरखनाथ दहीफळे यांनी दुकाने उघडल्यास कोणतीच अप्रिय घटना घडणार नाही, याबाबत कोरची येथील व्यापाºयांना हिंमत दिली. त्यामुळे कोरची येथील व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली. यावरून नक्षलवाद्यांची दहशत कमी झाली असल्याचे दिसून येत आहे.
दुर्गम भागात बंदला प्रतिसाद
कोरची येथील बाजारपेठ सुरू असली तरी कोटगूल, कोटरा, बोटेकसा, मसेली भागातील दुकाने बंद होती. महामंडळाच्या बसेस सुरू होत्या. मात्र खासगी वाहतूक बंद ठेवली होती. ग्रामीण भागातून नागरिक कोरचीत आले नसल्याने दुकाने उघडली असली तरी फारसा गर्दी दिसून येत नव्हती.
एटापल्ली तालुक्यातील एटापल्ली-जारावंडी, एटापल्ली-गट्टा मार्गावरील बससेवा व खासगी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्याचबरोबर इतरही तालुक्यांमध्ये दुर्गम भागातील बसफेºया बंद होत्या. नागरिकांनी रोवणीची कामे सुध्दा बंद ठेवली होती.