१८ वर्षानंतर कैकाडी समाज वस्तीत पोहोचली वीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 12:07 AM2019-06-02T00:07:47+5:302019-06-02T00:08:21+5:30
सध्याच्या युगात प्रत्येक घरी वीज पुरवठा असणे काळाची गरज आहे. मात्र वस्तीमध्ये विजच पोहोचली नसेल तर विविध समस्यांना तोंड देत राहावे लागते. गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून चामोर्शी मार्गावर दोन किमी अंतरावर असलेल्या कैकाडी समाज वस्तीत तब्बल १८ वर्षानंतर वीज पोहोचली. यामुळे सदर वस्तीतील कैकाडी समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
दिलीप दहेलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सध्याच्या युगात प्रत्येक घरी वीज पुरवठा असणे काळाची गरज आहे. मात्र वस्तीमध्ये विजच पोहोचली नसेल तर विविध समस्यांना तोंड देत राहावे लागते. गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून चामोर्शी मार्गावर दोन किमी अंतरावर असलेल्या कैकाडी समाज वस्तीत तब्बल १८ वर्षानंतर वीज पोहोचली. यामुळे सदर वस्तीतील कैकाडी समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
गडचिरोली शहराच्या गोकुलनगर, विवेकानंद नगर व इतर मोकळ्या ठिकाणी कैकाडी समाज बांधव आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होते. दरम्यान त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. दरम्यान १८ वर्षापूर्वी या समाजातील लोकांनी चामोर्शी मार्गावरील वन विभागाच्या झुडपी जंगलाच्या जागेवर झोपड्या बांधल्या. सद्य:स्थितीत या ठिकाणी ७० कुटुंब वास्तव्यास असून येथील लोकसंख्या ४०० च्या आसपास आहे. या ठिकाणी एक सार्वजनिक विहीर व हातपंप आहे. अलिकडे काही कुटुंबांनी स्वत:च्या घरी खासगी स्वरूपात बोअरवेल खोदले. त्यामुळे पाण्याची समस्या काही प्रमाणात मार्गी लागली आहे. या वस्तीमध्ये वीज पुरवठा नसल्याने सर्पदंशाने दोन ते तीन जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर सदर वस्तीतील नागरिकांनी वीज पुरवठ्याच्या मागणीबाबत नगर परिषद प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला, मात्र यश आले नाही.
शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या पाठपुराव्याला यश
आॅल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशन पदाधिकाऱ्यांनी दीड वर्षापूर्वी या वस्तीला भेट देऊन तेथील मूलभूत समस्या जाणून घेतल्या. येथील विजेचा प्रश्न सोडविण्याचा निर्धार त्यांनी केला.त्यानंतर फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय बांबोळे यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष पंडीत मेश्राम, उपाध्यक्ष रूपेश सोनटक्के, सचिव अरूण शेंडे, हेमंत मेश्राम आदींनी नगर परिषद, महावितरण तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात वारंवार भेटी देऊन या ठिकाणी विद्युतीकरणाचे काम करण्याची मागणी केली व सतत पाठपुरावा केला.
पक्के रस्ते व नाल्यांचा अभाव
कैकाडी समाज समाज वस्तीत वीज पोहोचविण्यासाठी महावितरणचे कार्यकारी अभियंता विजय मेश्राम यांचे सहकार्य लाभले. ५९ घरी वीज मीटर लावले आहे. मात्र या वस्तीत अद्यापही पक्के रस्ते व नाल्यांचा अभाव आहे. तसेच या वस्तीत प्राथमिक व पूर्व प्राथमिक शिक्षणाची सुविधा नाही. येथे अंगणवाडी व शाळेची सुविधा करणे आवश्यक आहे.