२३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लाहेरी-भामरागड रस्ता हाेणार चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:34 AM2021-04-12T04:34:52+5:302021-04-12T04:34:52+5:30
अतिदुर्गम व नक्षलग्रस्त गाव म्हणून ओळख असलेल्या भामरागड तालुक्यात रस्त्यांचे जाळे अद्यापही पसरले नाही. ग्रामीण भागात पायवाटेनेच नागरिकांना प्रवास ...
अतिदुर्गम व नक्षलग्रस्त गाव म्हणून ओळख असलेल्या भामरागड तालुक्यात रस्त्यांचे जाळे अद्यापही पसरले नाही. ग्रामीण भागात पायवाटेनेच नागरिकांना प्रवास करावा लागताे. अशा स्थितीतही बीआरओमार्फत भामरागड-लाहेरी रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते. गेल्या १० ते १५ वर्षांपासून सदर रस्त्याची दयनीय अवस्था झाली. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी लाहेरी परिसरातील नागरिक करीत होते.परंतु लाेकांचे समाधान करण्यासाठी थातूरमातूर दुरुस्ती दरवर्षी केली जायची. यासाठी लाखो रुपयांचा खर्च व्हायचा. परंतु काहीच उपयाेग हाेत नव्हता. दरवर्षी पावसाळ्यात रस्त्याच्या बाजूला अनेक वाहने फसत हाेती. त्यामुळे अनेकदा वाहतूक बंद व्हायची. ही समस्या लाहेरी परिसरातील नागरिकांसाठी डाेकेदुखीची ठरत हाेती. परंतु या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जायचे. एसटी महामंडळाची बस अनेकवेळा बंद-चालू झाली. याच कालावधीत लाहेरी व धोडराज पोलीस मदत केंद्रातील कर्मचारी व ग्रामस्थांनी श्रमदान करून अनेकवेळा दुरुस्तीसुद्धा केली. मात्र संबंधित विभाग व लोक प्रतिनिधींनी फारसे लक्ष दिले नाही. नागरिकांना खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागत होता. सध्या केंद्र शासनाकडून आलापल्ली-भामरागड-लाहेरी-बिनागुंडा मार्ग छत्तीसगड राज्यातील नारायणपूरला जाेडला जाणार आहे. याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण होऊन हा १८ किमीचा रस्ता चकाचक होण्याची शक्यता आहे.
बाॅक्स
४० गावांना मुख्यालयाशी जाेडणारा मार्ग
लाहेरी परिसरातील ४० गावांना भामरागड तालुका मुख्यालयाला जोडण्यासाठी लाहेरी-भामरागड मार्ग एकमेव आहे. याच मार्गाने नागरिक ये-जा करीत असतात. परंतु बांबू वाहतुकीची जड वाहने याच मार्गाने ये-जा करीत असल्याने चार-पाच वर्षांतच सदर मार्गाची दुरवस्था झाली. डागडुजीअभावी अनेक ठिकाणचे डांबर बेपत्ता होऊन मोठमोठे खड्डे पडले. पावसाळ्यात तर नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागताे. परंतु आता डांबरीकरण हाेत असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त हाेत आहे.