३० तासानंतर संपले आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 11:39 PM2019-01-17T23:39:37+5:302019-01-17T23:40:50+5:30

ट्रक आणि एसटी बसच्या धडकेत चार जणांनी जीव गमविल्यानंतर बुधवारी येथे सुरू झालेल्या आंदोलनाची तब्बल ३० तासांनी सांगता झाली. वनपाल प्रकाश अंबादे यांचा मृतदेह वन तपासणी नाक्याजवळ ठेवून झालेल्या या आंदोलनाला गुरूवारी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी भेट दिली.

After 30 hours, the end of the movement | ३० तासानंतर संपले आंदोलन

३० तासानंतर संपले आंदोलन

Next
ठळक मुद्देमृतदेहासह मांडला होता ठिय्या : पालकमंत्र्यांकडून आर्थिक मदतीसह रस्त्याच्या कामाचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : ट्रक आणि एसटी बसच्या धडकेत चार जणांनी जीव गमविल्यानंतर बुधवारी येथे सुरू झालेल्या आंदोलनाची तब्बल ३० तासांनी सांगता झाली. वनपाल प्रकाश अंबादे यांचा मृतदेह वन तपासणी नाक्याजवळ ठेवून झालेल्या या आंदोलनाला गुरूवारी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी भेट दिली. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाखापर्यंत आर्थिक मदत मिळवून देण्याचे, तसेच लोहखनिजाची वाहतूक होणाऱ्या मार्गाचे रूंदीकरण तातडीने सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन मागे घेऊन वनपाल अंबादे यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
एटापल्ली आलापल्ली मार्गावर बुधवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास झालेल्या या अपघातात लोहखनिज वाहतुकीसाठी जाणाऱ्या ट्रकने एसटी बसला जबर धडक दिल्याने ४ जणांचा मृत्यू झाला. अरुंद रस्त्यावरून होणाऱ्या सदर ट्रकच्या वाहतुकीमुळे नागरिकांचा जीव नेहमीच धोक्यात येत असल्याचे सांगत नागरिकांनी सकाळपासूनच आंदोलनात्मक पवित्रा घेतला होता. सायंकाळी या अपघातात मरण पावलेले एटापल्लीचे वनपाल प्रकाश अंबादे त्यांचा मृतदेह वनतपासणी नाक्याजवळ आंदोलनस्थळी ठेवण्यात आला. मृताच्या परिवाराला ५० लाखांची मदत, परिवारातील सदस्याला सुरजागड प्रकल्पात नोकरी, लोहखनिज वाहतुकीच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि तोपर्यंत वाहतूक बंद अशा अनेक मागण्या लावून धरत आंदोलकांनी मृतदेह उचलण्यास नकार दिला. त्यामुळे हे आंदोलन आणखी चिघळले.
गुरूवारी सकाळी माजी आमदार दीपक आत्राम व जि.प.उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी मंडपात येऊन अंबादे कुंटुबियांचे सांत्वन केले. यावेळी ग्रामसभेचे प्रमुख तथा जि.प.सदस्य सैनू गोटा, सारिका प्रवीण आईलवार आणि अनेक राजकीय पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. सकाळी १० वाजतानंतर मंडपात प्राणहिता पोलीस उपमुख्यालयाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयकुमार बन्सल व उपविभागीय अधिकारी कैलास अंडील यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण जोपर्यत पालकमंत्री व जिल्हाधिकारी येणार नाही तोपर्यत मृतदेह उचलण्यात येणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली.
दुपारी १२ वाजतानंतर धर्मरावबाबा आत्राम आणि जि.प.सभापती भाग्यश्री आत्राम दाखल झाले. त्यानंतर पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, जिल्हाधिकारी शेखर सिंग तसेच पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आंदोलनस्थळी पोहोचले. त्यांनी अंबादे कुटुंबांचे सांत्वत केले. यावेळी थोडा वेळ पालकमंत्र्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. दीपक आत्राम यांनी मृत परिवाराच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली. पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांनी समजूत काढत मागण्यांबाबत सकारात्मकता दाखविली. त्यामुळे आंदोलनकर्ते शांत झाले. त्यानंंतर दुपारी २ वाजता अंबादे यांचा मृतदेह हलविण्यात आला. पालकमंत्र्यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन अपघातात जखमींची विचारपूस केली. आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्ते, एटापल्ली येथील युवक, व्यापारी व नागरिकांनी बुधवारी रात्री जागरण करु न आंदोलन यशस्वी केले. अहेरीचे एसडीपीओ बजरंग देसाई व तसेच हेडरीचे एसडीपीओंच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
महामंडळ व लॉयड्सकडून २० लाखांची मदत
यावेळी पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी एसटी महामंडळाकडून मृतांच्या परिवाराला १० लाख तर लॉयड्स मेटल्स कंपनीकडून १० लाख अशी २० लाखांची मदत तत्काळ देण्यात येईल असे सांगितले. या मदतीत वाढ करून अधिक मदत मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. याशिवाय अनुकंपा तत्वावर मृत कुटुंबातील नातेवाईकाला नोकरी देण्यात येईल असे सांगितले. आलापल्ली-एटापल्ली या रस्त्याचे काम मंजूर असून हे काम ८ दिवसांत सुरू करू, तोपर्यंत सुरजागडमधील लोहवाहतूक बंद ठेवण्याचे आश्वासन यावेळी पालकमंत्र्यांनी दिले. अपघातामधील जखमींच्या उपचाराचा पूर्ण खर्च एस.टी. महामंडळ करणार आहे.
धर्मरावबाबांनी मांडला ठिय्या
माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे सकाळी अहेरीवरून एटापल्लीतील आंदोलनस्थळी येण्यास निघाले असताना त्यांना येलचिल येथील उपपोलीस ठाण्याच्या पोलिसांनी थांबवून कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे त्यांनी काही वेळ पोलीस ठाण्यासमोरच ठाण मांडून ही दडपशाही असल्याचा आरोप करीत निषेध व्यक्त केला.

Web Title: After 30 hours, the end of the movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.