४१ दिवसांच्या संघर्षाने त्यांना आला ‘पुनर्जन्म’ झाल्याचा प्रत्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:36 AM2021-05-23T04:36:30+5:302021-05-23T04:36:30+5:30
आरमोरी : कोरोनाचा ग्राफ आता कमी होत असला तरी कोरोनाबाधितांच्या मृतांची संख्या कमी होत नसल्याने हा चिंतेचा विषय झाला ...
आरमोरी : कोरोनाचा ग्राफ आता कमी होत असला तरी कोरोनाबाधितांच्या मृतांची संख्या कमी होत नसल्याने हा चिंतेचा विषय झाला आहे. मनाची हिंमत आणि सकारात्मक विचारांसोबत नातेवाइकांचा शाब्दिक आधार मिळाल्यास मृत्यूच्या दाढेतूनही व्यक्ती परत येऊ शकतो, याचे जिवंत उदाहरण येथील सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश जुआरे ठरले आहे. तब्बल ४१ दिवसांचा कोरोनाविरुद्धचा संघर्ष म्हणजे आपला पुनर्जन्मच ठरला, अशी भावना ते व्यक्त करतात.
आरमोरीच्या जुआरे परिवारातील सदस्य आणि चिमूर तालुक्यातील भिशी येथील आदर्श जनता विद्यालयातून काही महिन्यांपूर्वीच सेवानिवृत्त झालेले शिक्षक प्रकाश पांडुरंग जुआरे आणि त्यांची पत्नी तथा प्राथमिक शिक्षिका ज्योती जुआरे या दाम्पत्याने कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली. सुरुवातीला त्यांना साधी सर्दी व ताप होता. पण प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे त्यांनी भिसी येथून उमरेडला जाऊन कोरोना टेस्ट केली, ती पॉझिटिव्ह आली. मुलीच्या सासरकडील मंडळींच्या आसऱ्याने भंडाऱ्यातील खासगी रुग्णालयात ते भरती झाले. काही दिवसांतच पत्नी ज्योती यांची प्रकृती बरी झाली तरी प्रकाश यांचा सिटी स्कोर १८वर पोहोचला. ऑक्सिजन पातळीही ७०च्या आसपास घसरली. त्यामुळे श्वसनाचा त्रास वाढू लागला. डॉक्टरांना शाश्वती वाटत नसल्याने त्यांना नागपूरला हलविण्यास सांगितले. बेडसाठी शोधाशोध झाल्यानंतर वाडी येथील एका रुग्णालयात भरती करून उपचार सुरू झाले. त्यामुळे ऑक्सिजन पातळी ८०पर्यंत पोहोचली. पण काळ त्यांचा पिच्छा सोडायला तयार नव्हता. ज्या रुग्णालयात ते होते तिथे आग लागली. त्यातूनही ते सुखरूप बाहेर आले. दरम्यान, दुसऱ्या एका खासगी रुग्णालयात त्यांना भरती केले. त्यावेळी आवश्यक इंजेक्शन, ऑक्सिजनचा तुटवडा यांचा त्यांनाही सामना करावा लागला.
जावई डॉ. अजय साखरवाडे व मित्रांनी त्यावर तोडगा काढून भंडारा येथे मुलीच्या घरी ठेवण्याचा निर्णय घेतला. घरीच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेत सकारात्मक विचार कायम ठेवले. शेवटी मुलगी, जावयांचा भावनिक आधार आणि स्वत:मधील हिंमत यामुळे त्यांनी कोरोनाच्या संकटातून स्वत:ला सावरत पूर्णपणे त्यावर मात केली.
(बॉक्स)
अन् ऑक्सिजन मास्क फेकून ते आयसीयूबाहेर धावले
वाडी येथील एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) भरती असताना एक दिवस रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास प्रकाश जुआरे यांच्या बेडवरील एसीने अचानक पेट घेतला. हे दृष्य पाहून त्यांनी नाकावरील ऑक्सिजन मास्क बाजूला फेकत ‘आग आग’ म्हणत आयसीयूमधून बाहेर धूम ठोकली. डॉक्टर, नर्स यांच्यासह तेथील रुग्णांच्या नातेवाइकांची एकच धावपळ सुरू झाली. वेळीच त्यांनी आगीची घटना निदर्शनास आणून दिल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.