७० वर्षांनी अमडेलीत गेलेली बस पुन्हा धावलीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 11:10 PM2017-10-30T23:10:27+5:302017-10-30T23:11:01+5:30

पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी मोठा गाजावाजा करून आपल्या मतदारसंघातल्या अमडेली गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एसटी बस नेली.

After 70 years, the bus has not run again | ७० वर्षांनी अमडेलीत गेलेली बस पुन्हा धावलीच नाही

७० वर्षांनी अमडेलीत गेलेली बस पुन्हा धावलीच नाही

Next
ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी केली दिशाभूल : गावकºयांची संतप्त भावना, एसटी गावात आल्याचा आनंद ठरला औटघटकेचा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी मोठा गाजावाजा करून आपल्या मतदारसंघातल्या अमडेली गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एसटी बस नेली. एवढेच नाही तर स्वत: त्या बसनेच ते गावातही गेले. आता कित्येक वर्षांची प्रतीक्षा संपली असून ही बस दररोज आपल्या गावात येणार याचा अत्यानंद गावकºयांना झाला. पण हा आनंद औटघटकेचा ठरला. पालकमंत्री माघारी फिरताच ती बस पुन्हा त्या रस्त्याने धावलीच नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांनी आपली दिशाभूल केली, अशी संतप्त भावना त्या परिसरातील गावकरी जाहीरपणे व्यक्त करीत आहेत.
राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या विधानसभा मतदारसंघात येणारे अमडेली गाव वर्षानुवर्षे ‘जैसे थे’ स्थितीत आहे. ‘गाव तिथे एसटी बस’ हे महामंडळाचे ब्रिदवाक्य असले तरी या गावात स्वातंत्र्याच्या ७० वर्षातही बस पोहोचली नाही. कार्यकर्त्यांनी ही बाब पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देताच गेल्या २७ सप्टेंबरला पालकमंत्र्यांनी गावात बस नेण्याचे फर्मान सोडले. मग काय, बस जाण्यायोग्य रस्ता आहे का, नाल्यांवर पूल आहे का, या मार्गावरील प्रवास सुरक्षित राहील का वगैरे कोणत्याही बाबी तपासण्याची संधी मिळाली नसतानाही आदेशाप्रमाणे अहेरी आगाराच्या अधिकाºयांनी अमडेलीत नेण्यासाठी बस सज्ज केली. पालकमंत्री स्वत: बसमध्ये स्वार झाले. त्यांच्यासोबत एसटी महामंडळाचे अहेरी आगार व्यवस्थापक युवराज राठोड, बसस्थानक प्रमुख जे.बी. राजवैद्य, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, वाहतूक निरिक्षक बंडू तिलगामे, एस.के. डेरकर, चालक आर. जैसवाल, व्ही.एस.दुर्गे यांच्यासह पालकमंत्र्यांचे कार्यकर्तेही बसले. एस.टी.बस घेऊन प्रत्यक्ष अहेरी स्टेटचे राजे गावात आल्यामुळे गावकºयांचे चेहरे उजळून निघाले. नियोजित कार्यक्रम आटोपून पालकमंत्री रवाना झाल्यानंतर गावकरी आता आपली पायपीट थांबणार म्हणून आनंदात रममान होऊन दुसºया दिवशी, तिसºया दिवशी बसची वाट पाहू लागले, पण एक महिना लोटला तरी त्या गावात पुन्हा बस दिसलीच नाही. यामुळे नागरिकांचा अपेक्षाभंग झाला. पालकमंत्र्यांनी गावकºयांची दिशाभूल केली असा आरोप त्यांनी अहेरी आगार व्यवस्थापकांसह सिरोंचाचे प्र.तहसीलदार एस.एस.इंगळे, ना.तहसीलदार राहुल वाघ व इतर अधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. निवेदन देताना आदिवासी विद्यार्थी संघाचे तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम, रवी सल्लमवार, इरपा मडावी, सडवली जनगाम, सन्मय चौधरी, खिसा वेमुला व अमडेली येथील गावकरी उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षात ज्या गावाचे मागासलेपण दूर झाले नाही त्यांना नवीन सरकारच्या कार्यकाळातही ‘अच्छे दिन’ पहायला मिळणारच नाही का? असा प्रश्न या परिस्थितीवरून समोर येत आहे.
राजेंच्या इच्छेला राजवैद्यांनी घातला लगाम
पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव यांच्या इच्छेखातर एक दिवस अहेरी आगाराने अमडेली गावात कशीबशी बस नेली. पण प्रत्यक्षात तो रस्ता बस जाण्याच्या लायकीचाच नसल्याचे अहेरी बस स्थानक प्रमुख जितेंद्र राजवैद्य यांनी सांगितले. अगदी अरुंद रस्ता, तो सुद्धा सरळ नाही. कोणतेही बसफेरी सुरू करण्याआधी प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रस्ता योग्य आहे का, याचे सर्व्हेक्षण करावे लागते. वास्तविक आधी संबंधित विभागाला सूचना करून रस्ता, पूल सुसज्ज करायला पाहीजे होते. आम्ही प्रवाशांचा जीव धोक्यात घालून बसफेरी चालवू शकत नाही, असे राजवैद्य ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.
अन् पालकमंत्र्यांची बस पुलावरच फसली
गेल्या २७ सप्टेंबरला पालकमंत्र्यांना घेऊन अमडेलीकडे निघालेली बस गावाजवळच्या नाल्यावरून सुरक्षितपणे जावी म्हणून पोलीस दलाने नाल्यावर सिमेंटचे पाईप टाकून माती व दगडांचा एक तात्पुरता पूल बांधला. पण पालकमंत्र्यांची बस त्या पुलावर शेवटी फसलीच. शेवटी बसमधील सर्वांना खाली उतरवून बसचे फसलेले चाक काढावे लागले. त्यामुळे या रस्त्यावरून बसफेरी सुरू करण्याआधी रस्ता, पूल चांगला करणे गरजेचे आहे याची कल्पना पालकमंत्र्यांनाही आहे. असे असताना बसफेरी सुरू करण्याची स्टंटबाजी का केली? असा सवाल आविसंच्या पदाधिकाºयांनी उपस्थित केला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग अजुनही झोपेतच
सिरोंचा-अमडेली-चिटूर या मार्गे आसरअल्ली बसफेरी सुरू करण्याची मागणी गावकºयांनी केली आहे. गावात बस येत नसल्यामुळे दोन गावातील नागरिकांना अमडेलीपासून अहेरी रस्त्याला लागून असलेल्या तमदाला फाट्यापर्यंत १२ किलोमीटर पायी जाऊन सिरोंचा या तालुका मुख्यालयी यावे लागते. तसेच अमडेलीवरून वडदम फाट्यापर्यंत १४ किलोमीटर अंतर पायी तुटवत यावे लागते. वडदम फाट्यापासून अमडेली या गावापर्यंत गिट्टी मुरूम टाकून अमडेली या गावापर्यंत खडीकरण झाले आहे. पण रस्ता अत्यंत अरुंद आहे. शिवाय दोन छोट्या व एक मोठा नाला पार करताना पूल नाही. तरीही बांधकाम विभाग अद्याप झोपेत आहे.

Web Title: After 70 years, the bus has not run again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.