सव्वा महिन्यांनंतर तोडगट्टा आंदोलकांच्या भेटीला पोहोचले प्रशासन; तोडगा नाहीच
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 10:28 AM2023-04-18T10:28:58+5:302023-04-18T10:30:49+5:30
दमकोंडवाह बचाव कृती समिती व पारंपरिक सुरजागड इलाका समितीच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनातील गर्दी दिवसेंदिवस वाढतच गेली.
एटापल्ली (गडचिरोली) : रस्ते व प्रस्तावित लोहखाणींना विरोध करत छत्तीसगड सीमेवरील एटापल्ली तालुक्यातील तोडगट्टा येथे १३ मार्चपासून आदिवासींचे आंदोलन सुरू आहे.तब्बल ३५ दिवसांनंतर १७ एप्रिलला प्रशासन आंदोलनस्थळी पोहोचले. यावेळी आंदोलकांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला पण आंदोलक ठाम राहिल्याने तोडगा निघू शकला नाही. एटापल्लीपासून ६० किलोमीटर अंतरावर तोडगट्टा हे गाव आहे. तेथे रस्ते व लोहखाणींविरोधात १३ मार्चपासून आदिवासींनी आंदोलन सुरू केले.
दमकोंडवाह बचाव कृती समिती व पारंपरिक सुरजागड इलाका समितीच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनातील गर्दी दिवसेंदिवस वाढतच गेली. आदिवासी हेच जंगलाचे वैधानिक व कायदेशीर हकदार आहेत. त्यामुळे ग्रामसभेच्या मागणीनुसार कामे करावी, ग्रामसभेने मागणी केलेली नसताना परस्पर लोहखाण व रस्ते करू नयेत, अशी आंदोलकांची मागणी आहे. दरम्यान, एक महिना उलटूनही आंदोलनस्थळी प्रशासन पोहोचले नव्हते. १७ एप्रिलला सकाळी साडेदहा वाजता एटापल्लीचे नायब तहसीलदार, टी. व्ही. चौधरी, मंडळाधिकारी डी. टी. रामटेके तथा सी-६० जवान आंदोलनस्थळी पोहोचले. यावेळी नायब तहसीलदार टी. व्ही. चौधरी यांनी आंदोलकांची मागणी ऐकून घेतली.
आपल्या मागण्या शासनदरबारी पोहोचविल्या आहेत. ज्या ठिकाणी खाणींविरुद्ध आंदोलन सुरू आहे, तिथे लोहखाणीचा प्रस्तावच नसल्याचे स्पष्ट करून त्यांनी आंदोलन मागे घ्या, अशी विनंती केली. मात्र, आंदोलक ठाम राहिले. प्रस्तावित खाणींची कामे रद्द केली आहेत, अशी घोषणा केल्याशिवाय माघार घेणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. त्यामुळे अधिकाऱ्यांना रिकाम्या हाती परतावे लागले.
अधिकाऱ्यांना सी-६० चे सुरक्षा कवच
आंदोलनस्थळ हे संवेदनशील क्षेत्र आहे. त्यामुळे तेथे जायला प्रशासकीय अधिकारी धजावत नव्हते. अखेर सी- ६० जवानांचे सुरक्षा कवच घेऊन अधिकारी आंदोलनस्थळी पोहोचले. मात्र, तोडगा निघालाच नाही. त्यामुळे हे आंदोलन कोणत्या वळणावर पोहोचणार, याची उत्सुकता आहे.
प्रशासनाला आंदोलनस्थळी पोहोचण्यास एक महिना लागला. अधिकाऱ्यांनी केवळ आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. आम्ही महिनाभरापासून आंदोलन करत आहोत. प्रस्तावित खाणींची कामे रद्द केल्याची घोषणा करावी, त्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाहीत.
- सैनू गोटा, सुरजागड इलाका प्रमुख व माजी जि.प.सदस्य, गट्टा