अखेर आजारी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 12:14 AM2017-09-14T00:14:05+5:302017-09-14T00:14:22+5:30
भामरागड प्रकल्प कार्यालयाअंतर्गत एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील विनोबा आश्रमशाळेत इयत्ता तिसरीतील विद्यार्थी अशोक मंगू नरोटी तसेच त्याच्या लहान भावाला ताप येत होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : भामरागड प्रकल्प कार्यालयाअंतर्गत एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील विनोबा आश्रमशाळेत इयत्ता तिसरीतील विद्यार्थी अशोक मंगू नरोटी तसेच त्याच्या लहान भावाला ताप येत होता. एटापल्ली रुग्णालयात दाखल करूनही या दोन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीस सुधारणा झाली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या पालकांनी पुजाºयाकडे नेऊन उपचार करण्याचा निर्णय घेतला व या विद्यार्थ्यांना आश्रमशाळेतून घरी नेले. ही बाब माहीत होताच भामरागडचे प्रकल्प अधिकारी नीरज मोरे यांनी पुढाकार घेऊन सदर दोन्ही विद्यार्थ्यांना अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात मुख्याध्यापक व कर्मचाºयांमार्फत औषधोपचारासाठी दाखल केले. आता या दोन्ही विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहे.
अहेरी उपजिल्हा रुग्णलयात उपचार सुरु असतांना अशोकच्या वडिलांनी या रुग्णालयातून आपल्या दोन्ही मुलांना कोणालाही न सांगता एटापल्ली तालुक्यातील बेसेवाडा येथील घरी नेण्याचा प्रयत्न केला. ही बाब शाळेच्या मुख्याध्यापक संदीप पेंपकवार व शिक्षक उमेश चिट्टीवार यांना कळताच त्यांनी व वैद्यकीय अधिकाºयांनी या विद्यार्थ्यांचे वडिल मंगू नरोटी यांना दोन्ही विद्यार्थ्यांवर रुग्णालयातच उपचार करण्यात बाबत विनंती केली. मात्र ‘माझे मूले आहेत मी त्यांना घरी घेऊन जातो, पुजारीकडे नेऊन उपचार करतो, त्यांना काहीही झाले तरी चालेल, असे वारंवार बजाऊन सांगितले. शाळेच्या कर्मचाºयांच्या विनंतीला अनेकदा मंगू नरोटी यांनी झुगारून लावले.
शाळेचे मुख्याध्यापक संदीप पेंपकवार यांनी तत्काळ ही माहिती भामरागडचे प्रकल्प अधिकारी नीरज मोरे यांनी दिली. प्रकल्प अधिकारी नीरज मोरे यांनी काही वेळातच भामरागड वरून अहेरी गाठून उपजिल्हा रुग्णालयात आजारी विद्यार्थी व पालकाची भेट घेतली. मोरे यांनी पुजाºयाकडे न नेता उपजिल्हा रुग्णालयातच उपचार करावा अशी विनंती केली व विद्यार्थ्यांची समजूत काढली. काही वेळानंतर पालक व विद्यार्थी उपचार सुरू ठेवण्यासाठी तयार झाले. प्रकल्प अधिकाºयाच्या पुढाकाराने या दोन्ही विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.