अखेर प्राशिसचे उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 11:24 PM2018-03-19T23:24:04+5:302018-03-19T23:24:04+5:30
शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष धनपाल मिसार यांनी १५ मार्चपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले.
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष धनपाल मिसार यांनी १५ मार्चपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. या उपोषण मंडपाला अनेक नेत्यांनी भेट देऊन निवेदनातील मागण्या समजून घेतल्या. मात्र ठोस आश्वासन अथवा मागण्या निकाली निघाल्याशिवाय आपण उपोषण मागे घेणार नाही, असा निर्धार धनपाल मिसार यांनी केला होता. दरम्यान १९ मार्च रोजी सोमवारला खा. अशोक नेते, आ. कृष्णा गजबे, जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर व उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन सकारात्मक चर्चा केली. शिक्षकांच्या मागण्या लवकर निकाली काढणार, असे आश्वास खा. अशोक नेते यांनी दिल्यानंतर अखेर पाचव्या दिवशी सोमवारला मिसार यांनी उपोषण सोडले.
खा. नेते यांनी मिसार यांना लिंबू सरबत पाजून उपोषणाची सांगता केली. याप्रसंगी जि.प. सदस्य रमाकांत ठेंगरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुत्तीरकर, मुख्य लेखाधिकारी दीपक सावंत, शिक्षणाधिकारी (प्राथ.) ओमप्रकाश गुढे, शिक्षणाधिकारी (माध्य.) नानाजी आत्राम, पं.स. सदस्य विवेक खेवले, देसाईगंजचे पं.स. उपसभापती गोपाल उईके, भाजपचे पदाधिकारी स्वप्नील वरघंटे आदी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित नेत्यांनी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनपाल मिसार व इतर पदाधिकाऱ्यांशी शिक्षकांच्या विविध मागण्यासंदर्भात सांगोपांग चर्चा केली.
यावेळी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी रमेश रामटेके, नरेंद्र कोत्तावार, योगेश ढोरे, माया दिवटे, अरूण पुण्यप्रेड्डीवार, अशोक दहागावकर, गणेश काटेंगे, हेमंत मेश्राम, सुरेश नाईक, खिरेंद्र बांबोळे, राजेश बाळराजे, जयंत राऊत, रवींद्र मुलकलवार, डंबेश पेंदाम, मनोज रोकडे, शिवाजी जाधव, नरेश चौधरी, संजय लोणारे, प्रेमचंद मेश्राम, संगीता लाकडे, राकेश सोनटक्के, रोशनी राकडे, प्रभाकर गडपायले, जीवन शिवणकर, गुणवंत हेडाऊ, गुलाब मने, केशव पर्वते, रामदास मसराम, दिलीप नाकाडे, रवींद्र सोमनकर, इर्शाद शेख, अविनाश पत्तीवार, प्रशांत काळे, रवींद्र धोंगडे आदींसह बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते. यावेळी जयंत राऊत व प्रेमचंद मेश्राम यांनी आभार मानले.
प्राथमिक शिक्षक समितीतर्फे जिल्हाध्यक्ष धनपाल मिसार यांनी सुरू केलेल्या उपोषणाला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व अधिकाऱ्यांनी भेट देऊन शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या. सदर शिक्षक समितीतर्फे शिक्षकांच्या विविध मागण्यासंदर्भात वर्षभर आंदोलने व उपोषण करण्यात येते.
शिक्षकांच्या निवड श्रेणीचा मुद्दा दोन दिवसात निकाली काढणार, असे आश्वासन खा. अशोक नेते, आ. कृष्णा गजबे, जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर व उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. याशिवाय शासनाच्या मार्गदर्शन पत्राशिवाय शिक्षकांकडून एकस्तर वसुली होणार नाही. चार टक्के सादिल रक्कम एप्रिल-मे पर्यंत शाळेला उपलब्ध होणार, असे आश्वासन त्यांनी दिले.
स्वच्छतागृह बांधकामाच्या अंतिम हप्त्याचे अनुदान उपलब्ध होणार, स्थायी व चटोपाध्याय आदेश यथाशीघ्र निकाली काढण्यात येईल, असे आश्वासन खा. नेते यांनी दिले, अंशदायी पेंशन जमा रकमेचा ताळमेळ येत्या दोन ते तीन महिन्यात निकाली काढण्यात येईल.
मुख्यालयाची अट शिथील करण्यात येईल, उच्च श्रेणी असलेल्या शाळांमध्ये उच्च श्रेणी मुख्याध्यापकांची पदस्थापना करण्यात येईल. तसेच प्रसूती रजेवरव दुर्धर आजारी कर्मचाºयांचे नियमित वेतन काढणार, असे आश्वासन उपोषण मंडपात उपस्थित लोकप्रतिनिधींनी संघटनेच्या पदाधिकाºयांना दिले.