वडिलांचे अस्थिविसर्जन करून नववधू चढली बोहल्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 11:33 PM2019-05-30T23:33:37+5:302019-05-30T23:33:58+5:30
कन्यादान करण्याचे भाग लाभणे सर्वांच्याच नशिबी नसते. ज्याला हे भाग्य लाभते त्या पित्याला आपले जीवन कृतार्थ झाल्याचा आनंद नक्कीच लाभतो. अशाच आनंदात मुलीच्या लग्नाची तयारी करत असलेल्या वडिलाचा ऐन लग्नाच्या दोन दिवसांपूर्वी उष्माघाताने मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : कन्यादान करण्याचे भाग लाभणे सर्वांच्याच नशिबी नसते. ज्याला हे भाग्य लाभते त्या पित्याला आपले जीवन कृतार्थ झाल्याचा आनंद नक्कीच लाभतो. अशाच आनंदात मुलीच्या लग्नाची तयारी करत असलेल्या वडिलाचा ऐन लग्नाच्या दोन दिवसांपूर्वी उष्माघाताने मृत्यू झाला. पण ते दु:ख गिळून त्यांच्या लेकीने सकाळी वडिलांचे अस्थिविसर्जन करून सायंकाळी बोहोल्यावर चढण्याचा निर्णय घेतला.
ही कहानी आहे कोरचीतील विजय बोरकर (५०) व त्यांची मुलगी राणी यांची. गडचिरोली नजीकचा पोर्ला येथील मूळचे रहिवासी असलेले बोरकर कुटुंबीय २० वर्षांपूर्वी उदरनिर्वाह करण्यासाठी कोरचीला आले आणि येथेच स्थायी झाले. कोरचीच्या त्रिमूर्ती वाचनालयाच्या बाजूला शासकीय जागेत झोपडी बांधून ते राहात होते. कुटुंबात पत्नी व एक मुलगी असा छोटासा संसार होता. विजय बोरकर हे टिनटप्पर गोळा करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. पत्नी दुसऱ्याच्या घरची भांडीकुंडी घासून पतीला हातभार लावायची. त्यांना राणी नामक एकुलती एक मुलगी आहे. कुरखेडा तालुक्यातील लेंढारी येथील अनिल शेंडे या युवकाशी तिचा विवाह ठरला. ३० मे रोजी संध्याकाळी विवाहाचा मुहूर्त निघाला. रात्रदिवस राबुन, आहे त्याच परिस्थितीत एकुलत्या एक मुलीचे लग्न चांगल्याप्रकारे लग्न लावण्याची मनोमन इच्छा बाळगून विजय बोरकर कामाला लागले. पण कन्यादान करणे त्यांच्या नशिबीच नव्हते. नियतीने ऐनवेळी घात केला आणि त्यांच्यावर काळाने एकाएकी झडप घातली.
हात पिवळे होण्याआधीच पित्यावर अंत्यसंस्कार करण्याची पाळी मुलीवर आली. २९ मे रोजी मंडप पूजन होते. त्यानंतर गुरूवारी ३० मे रोजी सकाळी पित्याचे अस्थिविसर्जन केल्यानंतर संध्याकाळी दु:ख उराशी बाळगून ती बोहल्यावर चढली.
हळदीने पिवळे झालेले मुलीचे हात बघण्याची इच्छा विजयची होती. तिच्या लग्नातील आनंदासाठी फार मोठे काबाडकष्ट सहन केले. मात्र मुलीचा आनंदलेला चेहरा बघण्याचे भाग्य अभागी पित्याला लाभले नाही. तर सासरी जाताना वडिलाच्या कुशीत मन हलके करण्याचे भाग्यही राणीला लाभले नाही.
अन् स्वप्न अधुरेच राहिले
मुलीच्या लग्नात आवश्यक असणाºया गोष्टी झाल्या का? अजून कशाची गरज आहे? असे प्रश्न ते आपल्या अर्धांगिनीला विचारत होते, तर कधी आपल्या लाडल्या मुलीला काही पाहिजे काय? अशीही विचारणा करीत होते. जसजशी लग्नाची तारीख जवळ येत होती, तसतशी बापाला चिंता भेडसावत होती. लग्न पत्रिका वाटप करण्याबरोबरच इतर कामे करणेही गरजेचे होते. ती कामे करीत असतानाच २८ मे रोजी संध्याकाळी विजय बोरकर यांचा उष्माघाताने मृत्यु झाला.