दिड महिन्यानंतरही लोहखनिजाचे काम ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 01:25 AM2019-02-28T01:25:14+5:302019-02-28T01:25:41+5:30
एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावर असलेल्या लॉयड्स मेटल्सच्या लोहखाणींचे काम दिड महिन्यापासून ठप्प पडले आहे. त्यामुळे या कामावर जाणाऱ्या मजुरांची रोजगाराअभावी होरपळ होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावर असलेल्या लॉयड्स मेटल्सच्या लोहखाणींचे काम दिड महिन्यापासून ठप्प पडले आहे. त्यामुळे या कामावर जाणाऱ्या मजुरांची रोजगाराअभावी होरपळ होत आहे. हे काम तातडीने सुरू करण्यासाठी मजुरवर्गाने उपोषण सुरू केल्यानंतर जिल्हा प्रशासनातील अधिकारी, आमदार व कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मजुरांना काम सुरू करण्यासंदर्भात आश्वासन दिले. मात्र त्याला तीन आठवडे लोटले तरी काम सुरू झाले नसल्यामुळे त्यांचे आश्वासन हवेतच विरते की काय, अशी भावना मजुरवर्गात व्यक्त होत आहे.
गेल्या १६ जानेवारीला गुरुपल्ली गावाजवळ लोहखनिज वाहतूक करणाºया एका ट्रक आणि बसची टक्कर होऊन झालेल्या अपघातानंतर लोहखनिज काढण्याचे व वाहतुकीचे काम लगेच बंद करण्यात आले होते. पण काम बंद होताच शेकडो मजुरांचे हात रिकामे झाल्याने मजूरवर्गात असंतोष निर्माण झाला.
लोहखाणीचे काम सुरू करण्याची मागणी करीत त्यांनी पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाला साकडे घातले. पण त्याकडे दुर्लक्ष झाल्यानंतर त्यांनी ५ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. तिसºया दिवशी आ.डॉ.देवराव होळी, अतिरिक्त जिल्हाधिकारी दामोधर नान्हे, लॉयड मेटल्सचे उपाध्यक्ष अतुल खाडीलकर यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली. बंद असलेले काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मजुरांनी उपोषण मागे घेतले. पण त्या आश्वासनाला तीन आठवडे लोटूनही हाताला काम मिळत नसल्याने मजुरांमधील असंतोष वाढत आहे.
घोडे अडले कुठे? कारण गुलदस्त्यात
सुरजागड पहाडावरील लोहखनिज उत्खननाचे काम सुरु करण्यास लॉयड मेटल्स कंपनी व जिल्हा प्रशासन तयार आहे. परंतू या कामासाठी लागणारे पोलीस संरक्षण मिळत नसल्यामुळे लोहखनिज प्रकल्पाचे घोडे अडल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोहखनिज वाहतुकीसाठी स्थानिक स्तरावरील बेरोजगारांना ट्रकचे मालक बनविण्याचे स्वप्न दाखवत आपल्या हाताने ट्रकच्या चाव्या त्यांना दिल्या. परंतू प्रत्यक्षात त्या ट्रकला कामच मिळाले नाही तर त्यांच्या कर्जाचा हप्ता भरणार कसा? अशी शंका उपस्थित होत आहे. दुसरीकडे पुरेशी सुरक्षा मिळाल्यास महिन्यातून २५ दिवस काम देण्याची तयारी कंपनीकडून दाखविली जात आहे. त्यामुळे केवळ पोलीस संरक्षणाअभावी शेकडो मजुरांची मजुरी बुडत आहे, की यामागे अजून दुसरेच कोणते कारण आहे, याबाबत कोणीच जबाबदार व्यक्ती स्पष्टपणे बोलायला तयार नाही.