दुर्गा मातेच्या प्रतिष्ठापनेनंतर दारूरूपी राक्षसाचा केला संहार
By admin | Published: October 16, 2015 01:57 AM2015-10-16T01:57:20+5:302015-10-16T01:57:20+5:30
कुरखेडा तालुक्यातील कढोली येथील महिला व गावकऱ्यांनी मिळून गावात मागील वर्षी
वैरागड : कुरखेडा तालुक्यातील कढोली येथील महिला व गावकऱ्यांनी मिळून गावात मागील वर्षी दुर्गा मातेची प्रतिष्ठापणा केली. त्याचवेळी गावात दारूबंदी करण्याचा निर्धार करून या दारूबंदीची कडक अंमलबाजवणी करण्यात येत आहे. त्यामुळे गावातून दारूरूपी राक्षसाचा संहार झाला आहे. कढोलीत नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
कढोली येथे दुर्गा उत्सव व गुडीपाडवा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. येथील जुन्या बाजार चौकात मागील १५ वर्षांपासून नवरात्रीदरम्यान दुर्गा उत्सव साजरा केला जातो. मागील वर्षी गावकऱ्यांनी दुर्गा मातेचे मंदिर उभारून त्यामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापणा केली. या प्रतिष्ठापणेदरम्यान अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणारी दारू गावातून हद्दपार करण्याचा विडा गावातील महिलांनी उचलला. त्याचबरोबर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी महिलांनी स्वत: कंबर कसली व लक्ष घातले. त्यामुळे पोलिसांच्या सहकार्याशिवायसुद्धा गावात दारूबंदीची अंमलबजावणी होत आहे. दारूबंदी झाल्यामुळे आजपर्यंत गावात होणारे तंटे, भांडण अत्यंत कमी झाले आहेत. परिणामी गावात शांतता नांदण्यास सुरुवात झाली आहे.
मंदिरात नित्यनेमाने रोज सकाळी व सायंकाळी आरती केली जाते. या आरतीला गावातील महिला व आबालवृद्ध एकत्र येतात. या आरतीमुळे गावात वर्षभर धार्मिक वातावरण निर्माण होण्यास मदत होते. विशेष म्हणजे दुर्गा मंडळात सर्वच समाजाचे नागरिक सहभागी होतात. त्यामुळे एकोपा राहण्यास मदत होते. शेवटच्या दिवशी गोपालकाला करून महाप्रसादाने नवरात्र उत्सवाचा सांगता केली जाते. महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक सहभागी होतात. नवही दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याने नागरिकांची गर्दी उसळत असली तरी कुठेही गोंधळ होत असल्याचे दिसून येत नाही. नवरात्रीच्या निमित्ताने कढोली येथील महिलांनी घेतलेला दारूबंदीचा निर्णय इतर गावांसाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याची बाब बोलली जात आहे. (वार्ताहर)