जत्रेनंतर जीर्णोद्धाराच्या कामात गती येणार
By admin | Published: January 11, 2017 02:14 AM2017-01-11T02:14:55+5:302017-01-11T02:14:55+5:30
भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम काही महिन्यापूर्वी सुरू करण्यात आले होते.
पुरातत्व विभागाच्या चमूने घेतला आढावा : मार्र्कं डादेव येथे झाली बैठक
मार्र्कंडादेव : भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम काही महिन्यापूर्वी सुरू करण्यात आले होते. मात्र सदर काम गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी सोमवारी मार्र्कंडा येथे दाखल झाले. त्यांनी मंदिराची व सुरू असलेल्या कामाची पाहणी करून आढावा घेतला. महाशिवरात्रीच्या यात्रेनंतर मंदिर जीर्णोद्धाराच्या कामाला गती येणार, अशी माहिती अधिकाऱ्यांनी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना दिली.
भारतीय पुरातत्व विभागाचे पर्यवेक्षक डॉ. दिलीप चंबारिया, चंद्रपूरचे प्रभारी हेमंत उपरे यांनी मार्र्कंडात बैठक घेतली. यावेळी मार्र्कंडा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, उपाध्यक्ष मनोज पालारपवार, सचिव मृत्यूंजय गायकवाड, मार्र्कंडाच्या सरपंच ललीता मरस्कोल्हे आदी उपस्थित होते.
यावेळी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी मार्र्कंडादेव ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू असलेल्या कामांबाबत चर्चा केली. महाशिवरात्रीपर्यंत मंदिराचे काढण्यात आलेले सर्व दगड बाजूला करून भाविकांना पुजेकरिता जागा मोकळी करून देण्यात येईल, अशी माहिती चंबारिया व हुकरे यांनी या बैठकीत दिली. (वार्ताहर)
वीज बिलाचे एक लाख थकीत
मार्र्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी भारतीय पुरातत्व विभागाने मार्र्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वीज मिटरवरून वीज वापरली. आतापर्यंत एक लाख रूपयांचे वीज बिल ट्रस्टला प्राप्त झाले आहे. सदर बिलाची विभागाकडून भरपाई करून देण्यात येईल, असे आश्वासन त्यावेळी तत्कालीन पर्यवेक्षक नंदिरे शाहू व चंद्रपूर प्रभारी म्हस्के यांनी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना दिले होते. मात्र वीज बिलाची रक्कम अद्यापही ट्रस्टला देण्यात आली नाही, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष भांडेकर यांनी दिली.