प्रदीर्घ काळानंतर चामोर्शी येथील कोंडवाडा सुरू
By admin | Published: October 20, 2016 02:34 AM2016-10-20T02:34:53+5:302016-10-20T02:34:53+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून चामोर्शीतील कोंडवाडा बंद असल्यामुळे मोकाट गुरांचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता.
नगर पंचायतीचा निर्णय : मोकाट गुरांच्या त्रासापासून होणार सुटका
चामोर्शी : गेल्या अनेक वर्षांपासून चामोर्शीतील कोंडवाडा बंद असल्यामुळे मोकाट गुरांचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. रात्रीच्या वेळी अनेकदा या मोकाट गुरांमुळे अपघातही होत होते. मोकाट गुरांच्या त्रासापासून सुटका व्हावी, म्हणून कोंडवाडा सुरू करण्यात यावा, अशी मागणी जनतेची होती. अखेरीस चामोर्शी नगर पंचायतीने कोंडवाडा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
चामोर्शी नगर पंचायतीचे अध्यक्षा जयश्री वायलालवार, स्वच्छता सभापती विजय शातलवार, नगरसेवक वैभव भिवापुरे, मुख्याधिकारी आशीर्या जुही यांनी स्वत: उपस्थित राहून कोंडवाड्याची पाहणी केली व त्याची दुरूस्ती करून कोंडवाडा सुरू केला. मोकाट गुरांच्या त्रासापासून आता सुटका झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच नगरातील डुकर व मोकाट कुत्र्यांचाही बंदोबस्त व्हावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. चिचडोह प्रकल्पाच्या ठिकाणी असलेल्या मोकाट कुत्र्यांनी एकाच दिवशी ५० कोंबड्या फस्त केल्याची घटना मंगळवारी घडली. दिवाकर झलके यांच्या शेतातील व आसपासच्या शेतातील कोंबड्या व बकऱ्या या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. गावात डुकरांचाही मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट झाला असून अनेक दुचाकीस्वारांचे अपघात झाले आहे. त्यामुळे मोकाट डुकरे व कुत्र्यांचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)