सहा महिन्यात समस्या सोडविण्याच्या ग्वाहीनंतर सात तासांचा चक्काजाम मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2022 03:00 PM2022-09-03T15:00:01+5:302022-09-03T15:04:59+5:30
विजेच्या समस्येसाठी कोटगुल परिसरातील नागरिकांचे सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन
कोरची/मुरूमगाव (गडचिरोली) : कोरची तालुक्याच्या कोटगुल परिसरातील ४५ गावातल्या नागरिकांची गुरुवारी मुरूमगावच्या वीज उपकेंद्रावर धडक दिल्यानंतर शुक्रवारी महावितरण कार्यालयापुढील छत्तीसगडकडे जाणाऱ्या महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. भरउन्हात सलग सहा तास चाललेल्या या आंदोलनादरम्यान आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे यांनी वीज उपकेंद्राची अडलेली कामे लवकरात लवकर मार्गी लावून येणाऱ्या सहा महिन्यात विजेची समस्या पूर्णपणे दूर करण्याची ग्वाही दिली. त्यामुळे सलग दोन दिवस चाललेले हे आंदोलन मागे घेण्यात आले.
अनेकवेळा निवेदने देऊनसुद्धा समस्या सुटत नसल्याने गुरुवारी ३०० पेक्षा जास्त नागरिकांनी आपल्या मुलाबाळांसह मुरूमगाव येथे धडक देऊन गडचिरोलीवरून आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेराव घातला होता. मंजूर असूनही आणि निधी उपलब्ध होऊन कोटगुलच्या वीज उपकेंद्राचे काम राज्य शासनाने का थांबविले आणि ते कधी सुरू करणार याचे समाधानकारक उत्तर अधिकारी देऊ शकले नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी तंबू ठोकून रस्त्यालगतच मुक्काम केला.
संयमाचा बांध तुटला; ४५ गावांतील नागरिकांचा मुरुमगावच्या महावितरण कार्यालयावर ठिय्या
शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेपासून मुरूमगावच्या महावितरण कार्यालयापुढील महामार्गावर चक्काजाम आंदोलन सुरू करण्यात आले. कोटगुल येथील आठवडी बाजाराचा दिवस असताना, शेतीची कामे बंद ठेवून लहान मुलाबाळांसह नागरिकांनी चक्काजाम आंदोलनाला सुरुवात केली.
‘लोकमत’च्या बातमीने सर्वांची मुरूमगावकडे धाव
कोटगुल परिसरातल्या ४५ गावांतील नागरिकांनी गुरुवारी रात्रीपर्यंत केलेल्या आंदोलनाची आणि शुक्रवारी पुन्हा चक्काजाम आंदोलन करणार असल्याची बातमी सकाळी ‘लोकमत’मध्ये झळकताच सर्व यंत्रणेची धावपळ उडाली. आरमोरी क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे लगेच मुरूमगावकडे रवाना झाले. याशिवाय कुरखेडाचे उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे, कोरचीचे तहसीलदार सोमनाथ माळी, नायब तहसीलदार बोदेले, धानोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव, गडचिरोली महावितरणचे अधीक्षक अभियंता रवींद्र घाडगे, कार्यकारी अभियंता डोंगरवार, अतिरिक्त कार्यकारी अभियंता शैलेश वाशिमकर, धानोराचे उपकार्यकारी अभियंता देशोपाल शेंडे, मुरूमगावचे कनिष्ठ अभियंता चेतन लांडगे आंदोलनस्थळी आले.
- तर आमदारांच्या कार्यालयापुढे करणार उपोषण
१. कोटगुल क्षेत्रातील गावांची वीजपुरवठ्याची समस्या ढोलडोंगरी ३३ केव्ही उपकेंद्र उभारण्याने दूर होणार आहे. तसेच कोटगुल येथे बीएसएनएलचे ४ जी टॉवर उभारण्याचे काम सहा महिन्याच्या आत करणार असल्याची ग्वाही आ. कृष्णा गजबे यांनी आंदोलनकर्त्यांना दिली. बाकीच्या समस्या सोडविण्यासाठी कुरखेडा उपविभागीय अधिकारी निकाळजे व तहसीलदार सोमनाथ माळी यांनी कोरची तहसील कार्यालयात आठ दिवसांत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले.
२. कोटगुल क्षेत्रातील निकृष्ट दर्जाची कामे पाहण्यासाठी कोटगुल येथे ११ किंवा १२ सप्टेंबरला येणार असल्याचेही आमदारांनी नागरिकांना सांगितले. दिलेल्या ग्वाहीनुसार सहा महिन्यात सदर समस्या सुटल्या नाही तर आमदारांच्या कार्यालयापुढे आम्ही सर्व नागरिक उपोषणाला बसू, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला.
३. सकाळी चक्काजाम आंदोलन सुरू असताना मुरूमगाव येथील पोलीस उपनिरीक्षक गणेश आठवे यांनी चक्काजाम करणाऱ्या काही नागरिकांना जबरदस्तीने उठवण्याचा प्रयत्न केला; परंतु आंदोलनकर्त्यांनी कोणत्याही दबावाला न जुमानता आंदोलन सुरूच ठेवले. यात कोटगुल क्षेत्रातील सरपंच, लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय नेते, व्यापारी व शेकडो शेतकरी आपल्या मुलाबाळांसह सहभागी झाले होते.