हत्तींनंतर रानगव्यांचा धुडगूस; रबी धान केले बुंध्यापासून फस्त, शेतकऱ्यांचे नुकसान
By गेापाल लाजुरकर | Published: March 9, 2024 07:19 PM2024-03-09T19:19:36+5:302024-03-09T19:21:23+5:30
देसाईगंजच्या पूर्वेकडील भागात वाघांची दहशत अजूनही कायम आहे.
गडचिरोली: देसाईगंजच्या पूर्वेकडील भागात वाघांची दहशत अजूनही कायम आहे. सोबतच रानटी हत्तींच्या कळपाने शेतकऱ्यांसह वनविभागास सुद्धा जेरीस आणले आहे. हत्तींची दहशत कायम असतानाच आता १२ ते १३ च्या संख्येत असलेला रानगव्यांचा कळप देखील शेतातील धान पिके बुंध्यापासून फस्त करीत आहे. शुक्रवार ८ फेब्रुवारी रोजी पिंपळगाव- विहीरगाव जंगलपरिसरातील पिके रानगव्यांच्या कळपाने फस्त केली.
पिंपळगाव- विहीरगाव जंगलाला लागूनच सिद्धार्थ सहारे व सुखदेव शंभरकर यांचे शेत आहे. सध्या त्यांच्या शेतात. रबी धान पीक आहे. शुक्रवारच्या रात्री ८ वाजेच्या दरम्यान रानगव्यांनी शेतात प्रवेश करून दोन्ही शेतकऱ्यांचे धान पीक विळ्याने कापणी केल्यागत फस्त केले. त्यामुळे नांगरणी, चिखलनी,बी-बियाणे खरेदी, रोवणी, रासायनिक खते खरेदी व कीटकनाशके फवारणीचा खर्च वाया गेल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. हिरवेकंच धानपिके रानटी प्राणी फस्त करून मातीमोल केल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. सदर रानगव्यांचा कळप गत दोन वर्षांपूर्वीपासून पिंपळगाव वनक्षेत्रात वावरत आहे. या कळपाचे नागझिरा अभयारण्यात जाणे-येणे सुरू आहे; परंतु आजवर शेतशिवारातील पिकांची एवढी मोठी हानी झाली नव्हती. दरम्यान झालेल्या नुकसानीचे पंचनामे विहीरगावचे क्षेत्रसहायक कैलास अंबादे यांनी केले. नुकसान भरपाईसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी वनरक्षक दिगंबर गेडाम, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संतोष उईके, बाधित शेतकरी सिद्धार्थ सहारे व सुखदेव शंभरकर उपस्थित होते.
रानटी हत्तींसारखीच गव्यांची दिनचर्या
विहीरगाव परिसरात वावरणाऱ्या रानगव्यांच्या कळपाची दिनचर्या अगदी रानटी हत्तींसारखीच आहे. दिवसभर जंगलात, रात्री शेतात हा कळप वावरत असतो. धानाचे पीक विळ्याने कापले जावे, अशीच त्यांची चऱ्हाट आहे. त्यामुळे एकदा खाल्लेले पीक पुन्हा वाढण्यासाठी बराच कालावधी लागतो.